Join us  

हनुमा विहारी, पुजारा यांनी डाव सावरला

सराव सामना : सलामीवीरांच्या अपयशामुळे भारताच्या केवळ २६३ धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 4:58 AM

Open in App

हॅमिल्टन : हनुमा विहारीचे शतक आणि चेतेश्वर पुजाराच्या ९२ धावांमुळे भारताने न्यूझीलंड एकादशविरुद्ध सराव सामन्यात पहिल्या दिवशी सुरुवातीच्या पडझडीतून सावरत २६३ धावा उभारल्या. तिन्ही तज्ज्ञ सलामीवीर मयांक अग्रवाल (१), पृथ्वी शॉ (००) आणि शुभमान गिल(००)हे उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर फ्लॉप ठरले.

कर्णधार विराट कोहलीने सराव सामन्यापेक्षा नेट सरावास प्राधान्य दिले. हनुमा विहारी १०१ धावा काढून निवृत्त झाला. पुजाराच्या ९२ धावांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज २० धावादेखील काढू शकले नाहीत. न्यूझीलंडचा वेगवान गोलनदाज स्कॉट कुग्लेन याने ४० धावात ३ गडी बाद केले.कुग्लेनने अंगावर चेंडू टाकून शॉ ला शॉर्टलेगवर झेल देण्यात भाग पाडले. अग्रवालने यष्टीमागे झेल दिला तर चौथ्या स्थानावर आलेल्या शुभमानने गलीमध्ये झेल सोपवला. त्यावेळी भारताची ५ धावात ३ बळी अशी बिकट स्थिती होती.

अजिंक्य रहाणे (१८) हादेखील लवकर परतला. त्यानंतर मात्र हनुमा विहारी- पुजारा यांनी १९५ धावांची भागीदारी करत भारताच्या धावसंख्येला आकार दिला. या दोघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना लवकर यश मिळवू दिले नाही. न्यूझीलंडचे फिरकीपटू भारतीय फलंदाजांवर वरचढ ठरत असताना पुजाराने इश सोढीला षटकार खेचला. दिवसाच्या अखेरच्या सत्रातपुजारा गिब्सनचा बळी ठरला. दरम्यान विहारीने आक्रमक शतक गाठले.

भारताचे अखेरचे सहा फलंदाज फक्त ३० धावात बाद झाले. ऋषभ पंत पुन्हा एकदा बेजबाबदार फटका मारून एक्स्ट्रा कव्हरवर झेलबाद झाला. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत एकही चेंडू न खेळलेल्या रिषभ पंतचा आत्मविश्वास डळमळीतच होता.त्याने ३५ चेंडूत ४० धावा केल्या असताना पुन्हा एकदा आपली विकेट फेकली. जम बसल्यानंतर मोठी खेळी करण्यात त्याला परत अपयश आले. (वृत्तसंस्था)भारत : पहिला डाव- ७८.५ षटकात सर्वबाद २६३ धावा( चेतेश्वर पुजारा ९२, अजिंक्य रहाणे १८,हनुमा विहारी निवृत्त १०१ अवांतर २७)गोलंदाजी: कुग्लेन ३/४०, ईश सोढी ३/७२, गिब्सन २/२६, निशाम १-२९.भारताचे अखेरचे सहा फलंदाज फक्त ३० धावात बाद झाले. ऋषभ पंत पुन्हा एकदा बेजबाबदार फटका मारून झेलबाद झाला.ं

टॅग्स :न्यूझीलंड