Join us  

स्वत:च्या फलंदाजीवर विश्वास होता; अटीतटीच्या लढतीत राशिद खानची बॅट तळपली

गुजरात-हैदराबाद यांच्यात अटीतटीची लढत झाली. एका षटकात २२ धावांची गरज असल्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष पाहायला मिळाला.  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 6:16 AM

Open in App

मुंबई : सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर विजयी षट्कारासह चार चेंडूंत तीन षट्कार खेचणाऱ्या फलंदाजाला स्वत:च्या कामगिरीवर गर्व वाटायलाच हवा. अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खान याने ही कामगिरी केली. ‘यासाठी गेली दोन वर्षे फलंदाजीवर मेहनत घेत असल्याने स्वत:वर विश्वास होता,’असे राशिदने सांगितले.

गुजरात-हैदराबाद यांच्यात अटीतटीची लढत झाली. एका षटकात २२ धावांची गरज असल्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष पाहायला मिळाला.  शेवटच्या क्षणी गुजरातच्या राहुल तेवतिया आणि राशिद खान या दिग्गज जोडीने मोठे षट्कार लगावत विजय खेचून आणला. हैदराबादने गुजरातसमोर १९६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. गुजरातने पाच गडी राखून हा विजय मिळविला आहे. शानदार लेग स्पिनसाठी ओळखला जाणाऱ्या राशिदने बुधवारी ११ चेंडूंत नाबाद ३१ धावा कुटल्या. मार्को यान्सेनला त्याचे चार चेंडूंत तीन षट्कार मारले. स्वत:च्या खेळीबद्दल राशिद म्हणाला, ‘मैदानात उतरल्यानंतर स्वत:वर विश्वास ठेवून खेळलो. फलंदाजीवर भरवसा होता. यासाठी दोन वर्षांपासून मेहनत घेत होतो. ‘मॅचविनर’ होणे हा सुखद अनुभव आहे.’

राशिदचा ‘द स्नेक शॉट’राशिदने ऑनसाईडला मनगटाच्या बळावर अफलातून फटके मारले. हे पाहून अनेकांनी तोंडात बोट घातले. राशिदने या स्ट्रोकला ‘द स्नेक शॉट’ असे नाव दिले.  तो म्हणाला,‘ जेव्हा साप दंश करतो तेव्हा तो उसळी घेतो. त्याचप्रमाणे चेंडू पूर्ण टप्प्याचा असतो तेव्हा मी असा शाॅट बॅट पूर्णपणे स्विंग न करता मनगटाच्या बळावर मारतो. मला धाव घेण्याची गरजच भासत नाही. मारलेला चेंडू थेट सीमारेषेबाहेर जातो.’ 

रोजा पाळून खेळतोराशिद हा सामना खेळण्याआधी रोजा पाळतो. सध्या रमझानचा पवित्र उपवास सुरू आहे. राशिदचाही दररोज उपवास असतो, हे विशेष.

मुरलीधरन भडकलासनरायजर्सचा गोलंदाजी कोच मुथय्या मुरलीधरन हा यान्सेच्या अखेरच्या षटकातील खराब गोलंदाजीवर चांगलाच भडकला. राशिदने यान्सेनला षटकार लगावताच मुरलीचा संयम सुटला. डगआऊटमध्ये तो सहकारी खेळाडूंवर राग काढताना दिसला.

दुसऱ्या क्रमांकाचा विजयशेवटच्या षटकात २२ धावांची गरज असताना तेवतिया-राशीद जोडीने २५ धावा चोपत गुजरातसाठी विजय खेचून आणला. शेवटच्या षटकांत पूर्ण करण्यात आलेले हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे लक्ष्य होते. याआधी पहिल्या क्रमांकाची कामगिरी पुणे सुपरजांट्सच्या नावावर आहेत. त्यावेळी पंजाबविरुद्ध शेवटच्या षटकांत २३ धावांची आवश्यकता असताना धोनीने अक्षर पटेलच्या गोलंदाजीची पिसे काढत  पुण्याला विजयी केले होते. या यादीत डेक्कन चार्जर्स, मुंबई इंडियन्स आणि आरसीबीचा तिसरा क्रमांक लागतो. या संघांनी शेवटच्या षटकांत २१ धावा काढत सामना जिंकलेला आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२
Open in App