Join us  

मैदानाच्या आकारामुळे भारतीय फिरकीपटूंपुढे मोठे आव्हान

कसोटी मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेतही सरशी साधली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 4:08 AM

Open in App

- व्हीव्हीएस लक्ष्मण लिहितात...कसोटी मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेतही सरशी साधली. त्यात सर्वोत्तम बाब म्हणजे महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या दोन्ही सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना पूर्वीप्रमाणे यशस्वी फिनिश केला. अनुभवी धोनीच्या उपस्थितीमुळे मधली फळी बळकट झाली असून, त्याच्यात परिस्थितीनुसार खेळ करण्याची क्षमता आहे. दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर अशा प्रकारची खेळी केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल.या मालिकेतील आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे भुवनेश्वर व शमी यांना वन-डे क्रिकेटमध्ये पुन्हा लय प्राप्त झाली आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजांची कामगिरी कशी होते, याची उत्सुकता होती आणि भुवी व शमीच्या कामगिरीने आनंद झाला. त्यांनी नव्या व जुन्या चेंडूने अचूक मारा केला.मनगटाच्या जोरावर फिरकी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांमध्ये चांगली स्पर्धा दिसत आहे. मधल्या षटकांतील फिरकीपटूंची कामगिरी भारताच्या यशात महत्त्वाची ठरणार आहे. कुलदीपने मालिकेची सुरुवात केली, पण चहलने एकमेव सामना खेळताना सहा बळी घेत आपली छाप सोडली. या दोघांपैकी एकाची निवड करणे म्हणजे कर्णधार कोहलीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. भौगोलिक विचार करता आॅस्ट्रेलियापासून न्यूझीलंड अधिक अंतरावर नसले तरी तेथे मात्र भारतीय संघासाठी नवे आव्हान राहणार आहे. मायदेशात न्यूझीलंड संघ बलाढ्य भासतो. कारण ते एकसंघ होऊन खेळतात. त्यांना मायदेशातील मैदानाची चांगली कल्पना आहे, पण भारतीय संघाचा विचार करता या दौºयाची हीच वेळ योग्य आहे, असे मला वाटते.विश्वकप स्पर्धेत जशा वातावरणामध्ये खेळावे लागणार आहे ते सध्या न्यूझीलंडमध्ये त्यासोबत मिळतेजुळते वातावरण आहे. पहिल्या १० षटकांत गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे भारताला प्रथम गोलंदाजी करताना सुरुवातीला विकेट घेणे महत्त्वाचे ठरेल आणि फलंदाजी करताना सुरुवातीला विकेट जाणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. कारण येथील मैदाने तुलनेने छोटी असल्यामुळे विकेट जर हातात असतील तर अखेरच्या षटकांमध्ये धावगतीला वेग देता येईल. मैदानाच्या आकाराचा विचार करता फिरकीपटूंसाठी मोठे आव्हान राहील. स्क्वेअर सीमा तुलनेने लहान असतात. कुलदीप व चहल या परिस्थितीसोबत जुळवून घेतील. आॅस्ट्रेलियाच्या तुलनेत न्यूझीलंडचे आव्हान खडतर राहील, यात शंका नाही, पण भारतीय संघ येथे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधण्यात यशस्वी ठरेल, असा मला विश्वास आहे.