मुंबई: आयपीएल-१३ मध्ये सनरायझर्स हैदराबादचा राशिद खान जबरदस्त कामगिरी करत आहे. संघाच्या अनेक विजयांमध्ये राशिदच्या फिरकीचा मोलाचा वाटा आहे. मात्र राशिदची पत्नी कोण, याची माहिती शोधण्यास गेल्यास गुगलकडून अभिनेत्री अनुष्का शर्मा असं उत्तर मिळतं. आम्ही याबद्दल सर्च केल्यावर गुगलकडून मिळालेल्या आऊटपूटचा स्क्रीनशॉट सोबत जोडलेला आहे. राशिद खान वाईफ सर्च केल्यावर अनुष्काचं नाव आणि फोटो समोर येतात.
अनुष्का शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आहे. त्यामुळे राशिद खानची पत्नी असं सर्च केल्यावर अनुष्काचं नाव का येतं, याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
कोण आहे राशिद खान?
राशिद खान अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू आहे. १९९८ मध्ये जन्मलेला राशिद अफगाणिस्तानच्या संघाचा उपकर्णधार आहे. अफगाणिस्तानचा संघ जून २०१८ मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. त्या सामन्यात राशिद खेळला होता. त्यानंतर वर्षभरानंतर त्यानं बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत संघाचं प्रतिनिधित्व केलं. सर्वात कमी वयात कसोटी संघाचं नेतृत्व करणारा खेळाडू होण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला.
अनुष्का शर्मा कोण आहे?
अनुष्का शर्मा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं बँड बाजा बारात, पीके, सुलतान, ए दिल है मुश्किल, सुई धागा यासह अनेक चित्रपटांत काम केलं आहे. तीन वर्षांपूर्वी इटलीत अनुष्का आणि विराट विवाह बंधनात अडकले. ऑगस्ट महिन्यात विराट-अनुष्कानं आपण दोनाचे तीन होणार असल्याची 'गुड न्यूज' दिली.
राशिद खानची पत्नी सर्च केल्यावर अनुष्काचं नाव का येतं?
२०१८ मध्ये राशिदनं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्याला बॉलिवूडमधील आवडत्या अभिनेत्री कोण, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यानं अनुष्का शर्मा आणि प्रीती झिंटा असं उत्तर दिलं. त्यावेळी अनेक माध्यमांनी राशिदची आवडती अभिनेत्री अनुष्का शर्मा याबद्दलचं वृत्त दिलं. अनेकांनी त्याला सोशल मीडियावर मेन्शनही केलं. याच कनेक्शनमुळे गुगलवर राशिद खानची पत्नी सर्च केल्यानंतर अनुष्का शर्माचं नाव दिसतं.