- सचिन कोरडे
गोव्याच्या महिला संघाने नुकतेच ऐतिहासिक विजेतेपद पटकाविले. वरिष्ठ महिला एकदिवसीय स्पर्धा जिंकल्याने गोव्याच्या मुलींवर बीसीसीआय पदाधिका-यांच्या नजरा पडल्या. प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियातही या मुलींची चर्चा झाली. ही चॅम्पियनशीप गोव्याच्या मुलींचे भवितव्य बदलण्यास कारणीभूत ठरेल; कारण बीसीसीआय आयपीएलप्रमाणेच महिला लीग स्पर्धा सुरू करण्याच्या विचारात आहे. असे झाल्यास गोव्याच्या मुलींना प्राधान्य मिळेल. त्यांना क्रिकेटमधून उत्तम करिअर करता येईल, असे मत गोव्याच्या प्रशिक्षक देविका पळशीकर यांनी व्यक्त केले. गोव्याने विजेतेपद पटकाविल्यानंतर देविका थेट आपल्या घरी पुणे येथे गेल्या. त्या सध्या सुट्टीवर असून लवकरच त्या संघासोबत जुळतील. पुणे येथून त्यांनी ह्यलोकमतह्णशी संवाद साधला.
कोलकात्याच्या ईडन गार्डनवर इतिहास नोंदवल्यानंतर गोवा संघ आपल्या राज्यात परतला. दाबोळी विमानतळावर या संघाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. जीसीएचे पदाधिकारीही उपस्थित होते. एवढेच नव्हे, तर मुलींना ५० हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर झाले. मी क्षणाची साक्षीदार नव्हते. मला पुण्याला जावे लागले; परंतु, संघाचे ज्या पद्धतीने स्वागत करण्यात आले, ते ऐकून खूप आनंद वाटला. मुलींना असेच प्रोत्साहन मिळाले तर हा संघ पुढील टी-२० स्पर्धासुद्धा जिंकेल, याचा मला विश्वास आहे. आम्ही एलिट गटात प्रवेश मिळवला असून या स्पर्धेसाठीसुद्धा जोरदार तयारी करायची आहे. वन डे आणि टी-२० फॉर्मेटमध्ये बदल असल्यामुळे आम्ही रणनीती बदलणार आहोत. १५ सदस्यीय संघाची निवड केली जाईल. यापूर्वी, १-२ खेळाडू फिट नव्हते. तेही फिट झालेले आहेत. गोव्यासाठी ही समाधानाची गोष्ट असल्याचे पळशीकर यांनी सांगितले.
फिल्डिंगवर असेल भर...
यंदा गोव्याचा संघ परिपूर्ण आहे. असे असले तरी आम्ही क्षेत्ररक्षणावर अधिक भर देणार आहोत. क्षेत्ररक्षण ही अशी गोष्ट आहे. ज्यासाठी सर्व खेळाडूंना सहज योगदान देता येते. उत्तम क्षेत्ररक्षणामुळे प्रतिस्पर्धी संघावर दबाव पडतो आणि त्याचा फायदा उठवता येतो. टी-२० फॉर्मेटमध्ये क्षेत्ररक्षण महत्त्वाचे आहे. गोलंदाजीमध्ये आम्ही उत्तम कामगिरी केली आहे. वन डे स्पर्धेत कधी सलामी गोलंदाज यशस्वी ठरलेतर फिरकीपटू. या दोघांच्याही ताळमेळामुळे आम्ही यशस्वी ठरलो. शिखा पांडे, सुनंदा येत्रेकर, संतोषी राणे यांनी गोलंदाजीत छाप सोडली. गेल्या वर्षी आम्ही एकच टी-२० सामना जिंकलो होतो. त्या वेळी आमचे क्षेत्ररक्षण कमकुवत होते. त्यात यावर्षी सुधारणा करावी लागणार आहे.
यामुळेच ठरलो यशस्वी...
वन डे क्रिकेटमध्ये गोव्याने बाजी मारली. त्यामागची गुरुकिल्ली कोणती? ते प्रशिक्षक पळशीकर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, चार गोष्टींमुळे आम्ही विजेतेपद पटकाविले. त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे टीम युनिटी. शिखा पांडेच्या नेतृत्वाखालील हा संघ पूर्णत: एकजूट होता. मैदानात, मैदानाबाहेर आणि ड्रेसिंग रुममध्ये केवळ जिंकण्याचीच चर्चा असायची. दुसरी गोष्ट म्हणजे, गोलंदाजी. गोव्याची गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघावर भारी पडली. फिरकी आणि जलदगती गोलंदाजांचा उत्कृष्ट ताळमेळ होता. तिसरी गोष्ट म्हणजे फिटनेस. यंदा संघातील प्रत्येक खेळाडू फिट होत्या. त्यासाठी ट्रेनरने खास मेहनत घेतली. सांघिक खेळाच्या योगदानामुळे आम्ही जिंकू शकलो, असेही पळशीकर यांनी सांगितले.
जीसीए मैदानावर सामने
पर्वरी येथील गोवा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेतील चार सामने होतील. या स्पर्धेतील पहिला सामना १२ जानेवारी रोजी सौराष्ट्र आणि हरियाणा यांच्यात राजकोट येथे होईल. १३ रोजी गोवा आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सामना जीसीए मैदानावर होईल. त्यानंतर गोव्याचा सामना १५ रोजी बडोद्याविरुद्ध, १६ रोजी बंगालविरुद्ध आणि १७ रोजी मध्य प्रदेशविरुद्ध होईल.
प्रशिक्षकांबद्दल...
मूळ मालवण (महाराष्ट्र) येथील असलेल्या देविका पळशीकर यांनी भारताकडून एक कसोटी सामना आणि १५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी महाराष्ट्र आणि पश्चिम विभाग संघाकडूनही प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या सत्रापासून देविका गोवा सघाला मार्गदर्शन करीत आहेत. विश्वचषकात खेळणाºया शिखा पांडे हिचा आत्मविश्वास वाढविण्यात देविका यांचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे.