Join us

गेलची लंका प्रीमियर लीगमधून माघार

लंका प्रीमियर लीगमध्ये भारताचे माजी खेळाडू इरफान पठाण, मुनाफ पटेल, स्थानिक खेळाडू कुशल परेरा, कुशल मेंडिस, नुवान प्रदीप अशा अनुभवी खेळाडूंचा सहभाग असणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:57 IST

Open in App

कोलंबो :  आयपीएलमध्ये यंदा प्रारंभी सात सामन्यात बाहेर बसलेल्या ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलने संघात स्थान मिळताच स्वत:ची उपयुक्तता सिद्ध केली होती.  नंतरच्या सात सामन्यात  त्याने तुफान फटकेबाजी करीत २८८ धावा कुटल्या. गेलने किंग्ज पंजाब संघाची फलंदाजीची बाजू भक्कम करत तीन अर्धशतके ठोकली.  एका सामन्यात  तो ९९ धावांवर बाद झाला. आयपीएलपाठोपाठ लंका प्रीमियर लीगमध्ये त्याचा झंझावात पहायला मिळणार होता, मात्र त्याने  तडकाफडकी लीगमधून माघार घेतली आहे.

  लंका प्रीमियर लीगमध्ये भारताचे माजी खेळाडू इरफान पठाण, मुनाफ पटेल, स्थानिक खेळाडू कुशल परेरा, कुशल मेंडिस, नुवान प्रदीप अशा अनुभवी खेळाडूंचा सहभाग असणार आहे. यंदा  कँडी टस्कर्स संघाकडून ख्रिस गेलला करारबद्ध करण्यात  आले होते. इंग्लंडचा लियॉम प्लंकेटदेखील याच संघातून खेळणार आहे. मात्र काही कारणास्तव ख्रिस गेलने   माघार घेतली. कँडी टस्कर्स संघाने स्वत: ट्वीट करून याबद्दल अधिकृत घोषणा केली.या स्पर्धेत कोलंबो, कँडी, गॉल, दाम्बुला आणि जाफना असे पाच संघ एकूण २३ सामने खेळणार आहेत. २६ नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. २० साखळी सामन्यांनंतर १३ आणि १४ डिसेंबरला दोन उपांत्य सामने खेळले जातील. त्यानंतर १६ डिसेंबरला अंतिम सामना होईल.

मलिंगा, बोपारा यांचाही नकारलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगा आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज लियॉम प्लंकेट तसेच रवी बोपारा यांनीही खासगी कारण पुढे करीत एलपीएलमधून माघार घेतली. मलिंगाने तयारीसाठी पुरेसा वेळ नसल्याचे कारण दिले. तो गॉल ग्लॅडिएटर्सने नेतृत्व करणार होता. मार्चपासून सराव केला नसल्याने मोठ्या स्पर्धेत खेळणे कठीण होईल, असे मलिंगाने म्हटले आहे. एक दिवसाआधी पाकिस्तानचा खेळाडू सर्फराज याने देखील माघार घेतली होती.जाफना स्टॉलियन्सचे प्रतिनिधित्व करणारा रवी बोपारा यानेही माघार घेतली. दरम्यान कोलंबो किंग्स फ्रेन्चाईजीने द. आफ्रिकेचा माजी फलंदाज हर्षेल गिब्स याला कोच नेमले आहे. 

टॅग्स :ख्रिस गेल