नवी मुंबई : महिलांच्या क्रिकेट संघाने विश्वकप स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी केली आहे. त्यामुळे आगामी काळात महिला क्रिकेटचे भवितव्य उज्ज्वल आहे. भविष्यात आपल्या क्रिकेटची इतर देशांच्या संघांबरोबर तुलना करण्याऐवजी, येथील पुरुष व महिला संघातच तुलना होईल, असा विश्वास युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई प्रेस क्लब आणि मालवण कट्ट्याने पुरस्कृत केलेल्या माझगाव क्रि केट क्लबने २0१५-१६ या वर्षात कांगा नॉकआउट या स्पर्धेत विजेतेपद पटकावून, अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाºया कांगा लिग स्पर्धेत प्रवेश मिळवला. त्या निमित्ताने वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ठाकरे यांच्या हस्ते या संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर मुंबई क्रि केट असोसिएशनचे सचिव डॉ. पी. व्ही. शेट्टी, न्यू हिंदू स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर, संघाचे पुरस्कर्ते नगरसेवक किशोर पाटकर, माझगाव क्रि केट क्लबचे सचिव शाह आलम शेख, नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नवी मुंबईचा महिला क्रि केट संघ आणि १९ वर्षांखाली महिला संघाचे प्रतिनिधित्व करणारी, वाशीतील प्रकाशिका नाईक यांचाही विशेष गौरव करण्यात आला.