नवी दिल्ली : आयपीएलच्या बक्षिस रकमेत कपात करण्याच्या निर्णयावर नाराज झालेल्या आठ फ्रॅँचाईजी या संदर्भात लवकरच बैठक घेणार आहेत. त्यानंतर यावर काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पहिल्या चार फ्रॅँचायजीमध्ये वाटल्या जाणाऱ्या रकमेत ५० कोटीहून २५ कोटी इतकी कपात केली आहे.
दक्षिण भारतातील एका फ्रॅँचायजीने म्हटले आहे की, ‘आम्ही या निर्णयामुळे नाराज आहोत. प्ले आॅफ मधील रकमेमध्ये निम्मी कपात करण्यात आली आहे. या संदर्भात आमच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. फ्रॅँचाईजीने अनौपचारिक चर्चा केली आहे मात्र या मुद्यावर लवकरच बैठक घेतली जाईल.’
अन्य एका फ्रॅँचाईजीच्या अधिकाºयाने सांगितले की, ‘हा मोठा धक्का आहे. आम्ही आमच्या टीमसह त्याचप्रमाणे अन्य संघाशी या विषयी चर्चा करणार आहोत. लवकरच या संदर्भात बैठक होईल.’ आयपीएलचे यंदाचे सत्र २९ मार्च पासून वानखेडे स्टेडियमवर सुरु होईल. (वृत्तसंस्था)