Join us  

'चार दिवसांची कसोटी हा हास्यास्पद प्रयोग'

नॅथन लियोन, जस्टिन लँगर; ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा कडाडून विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 2:19 AM

Open in App

सिडनी : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) चार दिवसांच्या कसोटी प्रस्तावास एकीकडे इंग्लंडने भक्कम पाठिंबा दिला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने हा प्रस्ताव हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. या संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज नॅथन लियोन याने या प्रस्तावास कडाडून विरोध केला असून, जस्टिन लँगर याने पारंपरिक स्वरूप बदलू नये, असे मत मांडले.क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ केविन रॉबर्टस् यांनी मात्र आम्ही चार दिवसांच्या कसोटीचे स्वागत करीत असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर लियोनचा विरोध आश्चर्यकारक वाटतो. सीएने या प्रस्तावाचे स्वागत करीत वर्षअखेर अफगाणिस्तानविरुद्ध चार दिवसांचे कसोटी सामने खेळण्याचे संकेत दिले होते. लियोन म्हणाला, ‘मी या प्रस्तावाच्या विरुद्ध आहे. आयसीसी यावर विचार करणार नाही, अशी अपेक्षा आहे. तुम्ही जगात सर्वत्र खेळल्या गेलेल्या सर्वच सामन्यांवर नजर टाका. मी ज्या सर्वोत्कृष्ट कसोटी सामन्यांचा भाग होतो, ते सामने अखेरपर्यंत रोमहर्षक ठरले.’लँगरनेदेखील पाच दिवसांची कसोटी चार दिवसांची करू नये, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगितले. लँंगर पुढे म्हणाला,‘मी पारंपरिक क्रिकेटचा पाठिराखा आहे. यात अधिक बदल व्हावा, असे मला वाटत नाही. मी पाच दिवसांच्या कसोटी क्रिकेटलाच पसंती दर्शवतो. चार दिवसांचा कसोटी सामना या प्रकाराला नवसंजीवनी देणारा ठरणार असेल तर यावर विचार व्हायला हवा. तथापि, पाच दिवसांचेच सामने मी अधिक पसंत करेन. यात बदल होणे मला आवडणार नाही.’ (वृत्तसंस्था)पाच दिवसांचे सामने रोमांचकलियोन याने यासंदर्भात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २०१४ ला झालेल्या अ‍ॅडलेड कसोटीचे उदाहरण दिले. हा सामना यजमान संघाने अखेरच्या तासात जिंकला होता. तो पुढे म्हणाला,‘भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात २०१४ ला झालेला कसोटी सामना अखेरच्या तासात निर्णायक ठरला होता. २०१४ ला केपटाऊन येथील कसोटी सामनाही असाच गाजला. रेयॉन हॅरिस याने मोर्ने मोर्केल याची दांडी गूल केली तेव्हा केवळ दोन षटकांचा खेळ शिल्लक होता. मी चार दिवसांच्या कसोटीचा पाठिराखा नाही. चार दिवसांमुळे अनेक सामने अनिर्णीत सुटतील. पाचवा दिवस मोलाचा आणि निर्णायक असेल.’