Join us  

IND vs AUS: भारताच्या शानदार कामगिरीची पायाभरणी- लक्ष्मण

ऑस्ट्रेलियात सांघिक गुणवत्तेचा अभाव आहे आणि त्यामुळे मालिकेत ते ०-१ ने पिछाडीवर पडले आहे. आता यजमान संघावर नक्कीच दडपण येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 1:29 AM

Open in App

भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाचा दावेदार मानले जात होते. पाहुण्या संघाने मालिकेच्या पहिल्या लढतीत त्याची प्रचिती दिली. दरम्यान, अखेरच्या दिवशी खेळपट्टी पाटा व संथ होती, पण भारताने ३१ धावांनी विजय मिळवला. ही सर्वोत्तम कामगिरी नव्हती, पण भारताने पहिला कसोटी सामना जिंकत ऑस्ट्रेलियाला निराश केले, हे सत्य आहे. ऑस्ट्रेलियात सांघिक गुणवत्तेचा अभाव आहे आणि त्यामुळे मालिकेत ते ०-१ ने पिछाडीवर पडले आहे. आता यजमान संघावर नक्कीच दडपण येईल. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या संघाने आता शानदार कामगिरीची पायभरणी केली आहे. दिग्गज संघ प्रतिस्पर्धी संघावर लक्ष देण्यापेक्षा स्वत:च्या कामगिरीवर लक्ष देतात आणि विराट कोहली व रवी शास्त्री खेळाडूंसोबत याबाबत चर्चा करतील.दोन्ही संघांदरम्यान महत्त्वाचा फरक चेतेश्वर पुजारा ठरला. त्याने वेगवेगळ्या पद्धतीने प्रभावी फलंदाजी केली. पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात त्याने काही ड्राईव्ह खेळण्याचे टाळले व स्केअर ऑफ द विकेट खेळण्यावर भर दिला. त्यात धोकाही कमी होता. अश्विन बाद झाल्यानंतर पुजारा आक्रमक खेळला. तळाच्या फलंदाजांसह त्याने अप्पर कट किंवा पुलसारखे फटके खेळले. हे त्याचे फटके नाहीत. मी त्याच्या खेळीचा फॅन झालो. यावरून आॅस्ट्रेलियात दाखल होण्यापूर्वी त्याने योजना आखली होती आणि तशी तयारीही केली होती, हे सिद्ध होते. नॅथन लियोनने खेळपट्टीच्या रफचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि पुजाराने पुढे सरसावत त्याची ही चाल यशस्वी ठरू दिली नाही. त्याची ही योजना मला चांगली वाटली. लियोनची लय बिघडविल्यानंतर पुजाराने बॅटफुटवर धावा वसूल करण्यास प्रारंभ केला. समर्पण काय असते, हे पुजाराने दाखवून दिले. त्याचे सहकारी खेळाडू पुजारापासून बोध घेतील, असा मला विश्वास आहे. वेगवान गोलंदाजांची प्रशंसा करावी लागेल. पाचव्या दिवशी पाटा खेळपट्टी होती, पण त्यांनी शिस्तबद्ध मारा केला. मोठे स्पेल टाकून त्यांनी आपला फिटनेस सिद्ध केला. भारतीय संघाने पर्थमध्येही याच कामगिरीची पुनरावृत्ती करावी, असे मला वाटते.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया