बंगळुरु : भारताचे माजी फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी सोमवारी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) क्रिकेट निर्देशक म्हणून कार्यभार स्वीकारला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गेल्या महिन्यात ४७ वर्षीय लक्ष्मण यांची एनसीएचे क्रिकेट निर्देशक म्हणून नियुक्ती केली होती.
भारताच्या राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर राहुल द्रविड यांना एनसीएमधील आपले पद सोडावे लागले होते. यानंतर त्यांच्या जागी लक्ष्मण यांची निवड झाली. लक्ष्मण यांनी एनसीएचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दोन फोटो अपलोड करत ट्विट केले. त्यांनी म्हटले की, ‘एनसीए कार्यालयातील पहिला दिवस. रोमांचक आव्हान. भारतीय क्रिकेटच्या भविष्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.’
हे पद सांभाळण्यापूर्वी लक्ष्मण आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे मेंटॉर होते. लक्ष्मण यांनी सहा वर्षे बंगाल क्रिकेट संघटनेत फलंदाजी सल्लागार म्हणूनही जबाबदरी पार पाडली आहे. याशिवाय समालोचक म्हणूनही लक्ष्मण यांनी वेगळी ओळख निर्माण केली.