Join us  

निवडणूक लढणार का? सेहवागचं मोठं विधान; आणखी एक IPL टीम करण्याची मागणी

माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने एका क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने हजेरी लावली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 6:07 PM

Open in App

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने एका क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने हजेरी लावली. वीरेंद्र सेहवागने शिकारपूर येथील माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या बंगल्यावर राजकीय इनिंग सुरू करण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, मी इथे निवडणूक लढवायला आलो असे तुम्हाला वाटते का? तसेच वीरूने यावेळी उपस्थितांना संबोधित करताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

सांसद चषकाच्या अंतिम सामन्यातील प्रिन्स सेरेमनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेला वीरेंद्र सेहवाग विविध कारणांनी चर्चेत आला. तो निवडणूक लढवणार असल्याची चर्चा मागील काही कालावधीपासून सुरू आहे. छिंदवाडा विमानतळावर पोहोचताच तो थेट माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या शिकारपूर बंगल्यावर पोहोचला. येथे त्याला काही लोक भेटले. पत्रकारांशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांने एक मोठे विधान करत राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे सांगितले.

मध्य प्रदेशची IPL टीम करण्याची मागणी खासदार नकुलनाथ यांनी आयपीएल संघ बनवण्याबाबत याआधी केलेल्या मागणीबाबत वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, मध्य प्रदेशातील आयपीएल संघ असेल तर चांगले होईल जेणेकरून मध्य प्रदेशातील खेळाडूंनाही क्रिकेट खेळण्याची चांगली संधी मिळेल. मला आशा आहे की येथून चांगले खेळाडू तयार होतील, जे आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतील.

दरम्यान, छिंदवाडा येथे पत्रकारांशी चर्चा करताना वीरेंद्र सेहवागने वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. सेहवागला त्याच्या राजकीय खेळीबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने उत्तर दिले की, मी इथे निवडणूक लढवण्यासाठी आलो आहे असे तुम्हाला वाटते का? यावेळी वीरेंद्र सेहवागसोबत खासदार नकुलनाथ देखील उपस्थित होते.

टॅग्स :मध्य प्रदेशविरेंद्र सेहवागऑफ द फिल्डआयपीएल २०२४