नवी दिल्ली: पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर 'गजवा-ए-हिंद'ची स्वप्नं पाहत आहे. आम्ही आधी काश्मीर ताब्यात घेऊ आणि त्यानंतर भारतावर हल्ला करू, असं विधान अख्तरनं केलं आहे. समा टीव्हीशी बोलताना त्यानं हे वक्तव्य केलं. अख्तरचं हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. भारताविरोधात गरळ ओकणारा अख्तर हा पहिला क्रिकेटपटू नाही. याआधी शाहिद आफ्रिदी, जावेद मियांदाद यांच्यासारख्या क्रिकेटपटूंनीदेखील भारताविरोधात वादग्रस्त विधानं केली आहेत.
समा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शोएब 'गजवा-ए-हिंद'बद्दल बोलताना दिसत आहे. 'गजवा-ए-हिंद'चा अर्थ 'भारताविरोधात पवित्र युद्ध' असा होतो. 'आमच्या पवित्र पुस्तकात 'गजवा-ए-हिंद'चा उल्लेख आहे. नदी दोनदा रक्तानं लाल होईल. अफगाणिस्तानहून सेना अटॉकपर्यंत पोहोचेल. उझबेकिस्तानहून विविध तुकड्या पोहोचतील. हा सगळा भाग ऐतिहासिक क्षेत्र खोरासनशी संबंधित असून तो लाहोरपर्यंत पसरला आहे,' असं अख्तरनं मुलाखतीत म्हटलं आहे.
लोकांनी याबद्दल वाचन करावं असं तुम्हाला वाटतं का?, असा प्रश्न समा टीव्हीच्या वृत्तनिवेदिकेनं अख्तरला विचारला. त्यावर 'हो, त्यानंतर तिथून शमल मशरिक निघेल. त्यानंतर आपण काश्मीर फत्ते करून पुढे मार्गक्रमण करू,' असं उत्तर त्यानं दिलं. शोएबचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी शोएबवर टीका केली आहे.
शमल मशरिक शब्द अरब द्वीपकल्पाच्या उत्तरेला असलेल्या एका क्षेत्रासाठी वापरला जातो. 'गजवा-ए-हिंद' शब्दाचा वापर
पाकिस्तानमधील कट्टरपंथीय इस्लामिक प्रचारकांकडून केला जातो. हा शब्द पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाशी संबंधित आहे. शोएबनं वादग्रस्त विधानं करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी अनेकदा त्यानं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि इतर क्रिकेटपटूंबद्दल आक्षेपार्ह विधानं केली आहेत.