Join us  

न्यूझीलंडला वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न दाखवणाऱ्या दिग्गज फलंदाजाची निवृत्ती

Brendon McCullum Retirement न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅकलमने सोमवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 9:40 AM

Open in App

मुंबईः न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅकलमने सोमवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. सध्या मॅकलम कॅनडात सुरू असलेल्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये टोरोंटो नॅशनल्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्यानंतर तो युरो ट्वेंटी-20 स्लॅममध्ये सहभाग घेणार होता, परंतु त्याने याही स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यानं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट टाकून ही निवृत्ती जाहीर केली. मॅकलमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने प्रथमच वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मॅकलमने 2016मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो विविध ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळत होता. गतवर्षी त्याला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये एकाही संघाने आपल्या ताफ्यात घेतले नाही. त्याने न्यूझीलंड संघाकडून 101 कसोटी आणि 260 वन डे सामने खेळले आहेत. ''ग्लोबल ट्वेंटी-20नंतर मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. अभिमानानं आणि समाधानानं मी हा निर्णय जाहीर करत आहे. मी आता युरो ट्वेंटी-20 स्लॅममध्ये खेळणार नाही आणि आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांनी माझ्या निर्णयाचे स्वागत केले,''असे मॅकलमने लिहीले. मॅकलमने कसोटीत 6453 आणि वन डेत 6083 धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने 2015मध्ये  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, परंतु त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. मॅकलमने त्रिनबागो नाइट रायडर्स, टोरोंटो नॅशनल्स, ससेक्स, न्यू साऊथ वेल्स आणि वार्विकशायर या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएलमध्येही त्यानं चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आदी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानं आयपीएलच्या सलामीच्याच सामन्याला नाबाद 158 धावांची खेळी केली होती. त्यानं 370 ट्वेंटी-20 सामन्यांत 9922 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 55 अर्धशतकं आणि 7 शतकं आहेत. 

टॅग्स :ब्रेन्डन मॅक्युलमन्यूझीलंडचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरगुजरात लायन्सकोलकाता नाईट रायडर्स