Join us  

पाकिस्तानच्या पराभवासाठी हसन अलीवर होणाऱ्या टीकेवर रवी शास्त्री भडकले; मुख्य प्रशिक्षकपदाबाबतही मत मांडले 

पाकिस्तानच्या त्या पराभवाला हसन अलीला जबाबदार धरून त्यावर टीका केली गेली. हसन अलीची पत्नी भारतीय असल्यानं तिलाही लक्ष केलं गेलं आणि त्यांच्या मुलीलाही सोशल मीडियावरून धमकी दिली गेली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 4:34 PM

Open in App

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १९व्या षटकात हसन अलीनं ऑसी फलंदाज मॅथ्यू वेडचा झेल सोडला अन् त्यानंतर वेडनं सलग तीन षटकार खेचून विजय पक्का केला. पाकिस्तानच्या त्या पराभवाला हसन अलीला जबाबदार धरून त्यावर टीका केली गेली. हसन अलीची पत्नी भारतीय असल्यानं तिलाही लक्ष केलं गेलं आणि त्यांच्या मुलीलाही सोशल मीडियावरून धमकी दिली गेली. हसन अलीच्या बचावासाठी पाकिस्तानी खेळाडू पुढे आलेच, त्याशिवाय टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनीही टीकाकारांना सुनावले.

मॅथ्यू वेडनं १९व्या षटकात  शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार खेचून ऑस्ट्रेलियाचा  ५ विकेट्स व १ षटक राखून विजय पक्का केला. त्या षटकात तिसऱ्या चेंडूवर हसन अलीनं जीवदान दिला अन् तोच महागात पडला. पण, रवी शास्त्रींनी NDTV शी बोलताना म्हटले की, उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानच्या पराभवाला एका खेळाडूला जबाबदार धरणे चुकीचे आहे. खेळाडूनं झेल सोडला म्हणून संघ हरला, असं म्हणणे चुकीचं आहे. हा सांघिक खेळ आहे.''

यावेळी शास्त्री यांनी प्रशिक्षकाबाबतही स्पष्ट मत मांडले, इंग्लंड दौऱ्यादरम्यान मी ठरवले होते, की ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील निकाल काही लागो, आम्ही जिंकू किंवा हरू मी या पदावर कायम राहणार नाही.

रवी शास्त्री यांची टीम इंडियासोबतची साथ...

  • २०१४साली रवी शास्त्री यांची आठ महिन्यांकरीता भारतीय संघाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २०१७मध्ये ते मुख्य प्रशिक्षक म्हणून रुजू झाले आणि १६ ऑगस्ट २०१९मध्ये त्यांची फेरनिवड झाली.
  • रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतानं ४३ कसोटींत २५ विजय व १३ पराजय पत्करले आहेत. ५ सामने बरोबरीत सुटले. ७६ वन डे पैकी ५१ विजय , २२ पराजय,  तर ६५  ट्वेंटी-२०त ४३ विजय व १८ पराजय असा शास्त्री यांचा प्रशिक्षक म्हणून प्रवास आहे.
  • त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियानं दोन वेळा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत धुळ चारली. ७० वर्षांनंतर भारतीय संघआनं ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला आशियाई संघ ठरला.
  • ४० महिने भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर होता. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथे मर्यादित षटकांची मालिका जिंकण्याचा पराक्रम.
टॅग्स :रवी शास्त्रीट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१पाकिस्तान
Open in App