- सुनील गावसकर लिहितात...
दुस-या वन-डे सामन्यात महेंद्रसिंह धोनीची संयमी खेळी बघितल्यानंतर भारताचा हा माजी कर्णधार मर्यादित क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा अविभाज्य भाग का आहे? याची कुणाच्या मनात शंका राहणार नाही. धोनीपासून प्रेरणा घेत संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सामना जिंकून देणारी खेळी केली. भुवी जागरूक स्वभाव असलेली व्यक्ती आहे. कुठलेही दडपण न बाळगता त्याने व्यावसायिक पद्धतीने आपली भूमिका चोख बजावली. त्याच्यावर धोनीचा प्रभाव दिसून आला. प्रत्येक चेंडूनंतर धोनी भुवनेश्वरचा उत्साह वाढविण्यासाठी त्याच्यासोबत संवाद साधत होता. फिरकीपटू गोलंदाजी करीत असताना माजी भारतीय कर्णधार चेंडू कसा वळत आहे आणि तो कसा खेळायचा, याची माहिती देत असल्याचे दिसून आले. ही सूचना देत असताना त्याचे उत्तम प्रात्यक्षिक तो देत होता. भारतीय संघ क्षेत्ररक्षण करीत असताना धोनी गोलंदाजांना चेंडूची दिशा, टप्पा आणि क्षेत्ररक्षणाबाबत चर्चा करीत होता. विराट कोहली केवळ आदर म्हणून धोनीला हे अधिकार बहाल करीत नसून, त्याचा संघाच्या माजी कर्णधारावर पूर्ण विश्वासही आहे. धोनीने श्रीलंकेचा सर्वांत अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाविरुद्ध स्वत:कडे स्ट्राईक ठेवला आणि प्रतिस्पर्धी संघावर दडपण निर्माण करण्यासाठी एकेरीच्या स्थानी दुहेरी धावा वसूल करण्याचा प्रयत्न केला. या जोडीचा जम बसल्यानंतर श्रीलंकेच्या तंबूत निराशा पसरली. त्यांनी पराभव स्वीकारला असल्याचे त्यांच्या देहबोलीवरून झळकत होते.
या पराभवानंतरही श्रीलंका संघासाठी काही बाबी समाधान देणाºया ठरल्या. पहिल्या सामन्याच्या तुलनेत त्यांच्या गोलंदाजीमध्ये भेदकता दिसून आली. याचे सर्व श्रेय धनंजयाला जाते. त्याने रहस्यमयी गोलंदाजी करताना भारतीय दिग्गजांना बुचकळ्यात टाकले. जाधव, कोहली, राहुल, पांड्या यांना त्याचा गुगली चेंडू समजलाच नाही, तर रोहित शर्माने एका सरळ चेंडूवर स्वीपचा फटका खेळताना चूक केली. स्वीपच्या फटक्यावर बºयाच धावा फटकावल्या जातात, पण हा फटका हुकच्या फटक्याप्रमाणे आहे. फटका अचूक खेळण्यात आला नाही तर जोखीम असते. सामन्यादरम्यान उभय संघांनी स्वीपचा चुकीचा फटका खेळून प्रत्येकी दोन विकेट गमावल्या. श्रीलंकेतर्फे कुशल मेंडिस व अँजेलो मॅथ्यूज याचे बळी ठरले. त्यामुळे लढतीचे पारडे भारताच्या बाजूने झुकले. त्याचप्रमाणे भारतीय डावादरम्यान रोहित शर्मा व शिखर धवन स्वीपचा फटका खेळण्यात अपयशी ठरले आणि संघाची घसरगुंडी उडाली.
राहुल व जाधव यांच्या फलंदाजी क्रमाबाबत केलेला बदल लाभदायक ठरला नाही. पण दोघेही चांगले खेळाडू आहेत आणि त्यांना यासाठी अधिक संधी मिळणे आवश्यक आहे. तिसरा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ अशा प्रकारचे अधिक प्रयोग करू शकतो. पण तोपर्यंत पहिल्या पसंतीच्या संघाला पसंती देणे योग्य ठरेल. (पीएमजी)