नीलेश देशपांडे
इंदूर : ध्रुव शोरे याने संयमी फलंदाजीचा परिचय देत नाबाद शतक ठोकताच रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात पहिल्या दिवशी विदर्भाविरुद्ध दिल्लीने सहा गड्यांच्या मोबदल्यात २७१ धावा उभारल्या. विदर्भाच्या गोलंदाजांनीही प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजविल्याने दोन्ही संघांची ताकद सिद्ध झाली.
शोरेने २५६ चेंडू टोलवून नाबाद १२३ धावा केल्या. प्रथमश्रेणीतील हे त्याचे तिसरे तसेच महत्त्वपूर्ण शतक होते. संपूर्ण दिवस खेळून त्याने १७ चौकार मारले. विदर्भाचा कर्णधार फैज फझलने नाणेफेक जिंकताच सकाळच्या धुक्याचा लाभ मिळावा म्हणून क्षेत्ररक्षण घेतले. कुणाल चंदेला पहिल्याच षटकांत बाद झाल्यानंतर आलेल्या २५ वर्षांच्या शोरेने होळकर स्टेडियमवर विदर्भाच्या गोलंदाजांचा खंबीर सामना केला. हिंमतसिंगसोबत त्याने पाचव्या गड्यासाठी १०५ धावांची भागीदारीही केली. हिंमतने ७२ चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांसह ६६ धावांचे योगदान दिले. अनुभवी गौतम गंभीरही लवकरच बाद झाला. शोरेने दिवसभर दिल्लीला सावरले खरे पण हिंमत बाद होताच संघ निराश झाला. सरवटे आणि गुरबानीची गोलंदाजी फोडून काढणारा हिंमत यष्टिमागे झेलबाद झाला.
गुरबानीने दोन व आदित्य ठाकरे याने पदार्पणात दोन गडी बाद केले. चंदेला ठाकरेच्या चेंडूवर झेलबाद झाला तर अक्षय वखरेने गंभीरची(१५) दांडी गुल केली. ठाकरेने नीतीश राणा (२१) याला पायचित केले. कर्णधार रिषभ पंत (२१) उपाहारानंतर गुरबानीच्या बाहेर जाणाºया चेंडूवर अलगद जाळ्यात अडकला. ४ बाद ९९ वरुन शोरे आणि हिंमत यांनी संघाला सावरले. दिल्लीने दुसºया सत्रात २७ षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात ९१ धावा खेचल्या. हिंमत वादग्रस्तरीत्या बाद झाला.मनन शर्मा(१३)याने पहिल्या स्लिपमध्ये फझलकडे झेल दिला. खेळ संपला तेव्हा शोरे आणि विकास मिश्रा (५) नाबाद होते.
>धावफलक
दिल्ली पहिला डाव : कुणाल चंदेला झे. फझल गो. ठाकरे ००, गौतम गंभीर त्रि. गो.वखरे १५, ध्रुव शोरे खेळत आहे १२३, नीतीश राणा पायचित गो. ठाकरे २१, रिषभ पंत झे. वाडकर गो. गुरबानी २१, हिंमतसिंग झे.वाडकर गो. गुरबानी ६६, मनन शर्मा झे, फझल गो. नेरळ १३, विकास मिश्रा खेळत आहे ५, अवांतर: ७, एकूण : ८८ षटकांत ६ बाद २७१ धावा. गोलंदाजी : आदित्य ठाकरे २१.१-३-६५-२, रजनीश गुरबानी १६.५-५-४४-२, सिद्धेश नेरळ १९—३-५७-१, अक्षय वखरे १६-५-३४-१, आदित्य सरवटे १२-०-६०-०, फैज फझल १-०-५-०, आर. संजय २-०-३-०.
>अक्षय वखरेचे २०० बळी : दिल्लीचा अनुभवी फलंदाज गौतम गंभीर याची दांडी गुल करीत विदर्भाचा फिरकीपटू अक्षय वखरे याने २०० बळींचा टप्पा गाठला. प्रीतम गंभीरनंतर अशी कामगिरी करणारा अक्षय दुसरा गोलंदाज आहे. २००८ मध्ये प्रथमश्रेणीतून निवृत्त होण्याआधी गंधेने १०० सामन्यात ३४० गडी बाद केले. ३२ वर्षांचा वखरे याने २००६ मध्ये केरळविरुद्धपालक्कड येथे पदार्पण केले. तेव्हापासून तो ५७ सामने खेळला आहे.