Join us  

ही पहिली अन् अखेरची सूचना, यानंतर मला दोषी ठरवू नका; अश्विनचे पाँटिंगला ट्विट

दिल्लीने आरसीबीविरुद्ध ५९ धावांनी विजय मिळवला खरा, पण यावेळी चर्चा रंगली ती मांकडिंगची.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 12:55 PM

Open in App

मुंबई : यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळणारा रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) पहिल्याच सामन्यात दुखापतीमुळे बाहेर झाला. गोलंदाजीदरम्यान चेंडू अडवताना खांदा दुखावल्याने त्याने केवळ एक षटक गोलंदाजी केली आणि नंतर काही सामनेही तो संघाबाहेर बसला. यानंतर मात्र त्याने जबरदस्त पुनरागमन केले. सोमवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध (Royal Challengers Banglore) अश्विनने टीच्चून मारा करत एक बळीही घेतला. दिल्लीने आरसीबीविरुद्ध ५९ धावांनी विजय मिळवला खरा, पण यावेळी चर्चा रंगली ती मांकडिंगची. यावर अश्विनने आता ट्वीटही केले असून ही शेवटची सूचना असेल, असेही सांगितले.

आरसीबीविरुद्ध गोलंदाजी करताना चेंडू फेकण्याआधीच नॉन स्ट्राईकला असलेल्या अ‍ॅरोन फिंचने क्रीझ सोडली आणि यावेळी अश्विनला मांकडिंगद्वारे फिंचला बाद करण्याची नामी संधी मिळाली. परंतु, अश्विनने त्याला बाद न करता फक्त सावध केले. याआधी २०१९ सालच्या सत्रात अश्विनने जोश बटलरला अशाच प्रकारे बाद केले होते. यानंतर क्रिकेटविश्वात नवा वादही निर्माण झाला होता. यावर आता अश्विनने ट्वीटरवर मेसेज पोस्ट केला असून, ‘यंदाच्या वर्षात अशाप्रकारे बाद करण्यासाठी ही पहिली आणि अखेरची सूचना असेल.’ असा संदेश दिला आहे.

अश्विनने ट्वीट केले की, ‘मी एक गोष्ट स्पष्ट करतो. ही २०२० वर्षासाठी पहिली आणि अखेरची सूचना आहे. मी हे अधिकृतपणे सांगतोय आणि यानंतर मला दोषी ठरवू नका.’ या मेसेजसोबत अश्विनने दिल्ली प्रशिक्षक रिकी पाँटिंगला टॅग केले असून त्याने प्रशिक्षक पाँटिंगला इशाराच दिला आहे. कारण, यंदा मांकडिंग न करण्याबाबत पाँटिंगने अश्विनला सांगितले होते. त्याचबरोबर, ‘अ‍ॅरोन फिंच आणि मी चांगले मित्र आहोत,’ असेही अश्विनने म्हटले आहे.  

टॅग्स :IPL 2020बीसीसीआय