Join us  

विराट कोहलीला ५०० रुपयांचा दंड, पाणी वाया घालवल्याची शिक्षा

'पाणी वाया घालवल्याप्रकरणी जवळपास 10 अन्य लोकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.' 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 4:35 PM

Open in App
ठळक मुद्दे विराट कोहली सध्या वर्ल्डकपसाठी इंग्लड दौऱ्यावर आहे. पाणी वाया घालवल्यामुळे कोहलीला दंड करण्यात आलेला आहे. वर्ल्डकपमधील सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 6 विकेट्सनी नमवून टीम इंडियानं विजयी सलामी दिली.

गुडगाव : टीम इंडियाचा कप्तान विराट कोहलीला वर्ल्डकप सुरु असताना दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड षटकांची गती कमी राखली किंवा खेळभावनेला धोका पोहोचवल्यामुळे करण्यात आलेला नाही. तर पाणी वाया घालवल्यामुळे कोहलीला दंड करण्यात आलेला आहे.

विराट कोहलीला पाणी वाया घालवल्याप्रकरणी गुडगाव महानगर पालिकेने 500 रुपयांचा दंड आकारला आहे. डीएलएफ फेस-1मधील विराट कोहलीच्या घराच्याबाहेर असलेल्या पाईपने गाडी धुतल्याप्रकरणी आणि पाणी वाया घालवल्याप्रकरणी त्याचा मदतनीस दीपक याच्याकडून महानगर पालिकेने 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. बुधवारी विराट कोहलीच्या सी-1/10 या घरच्या पत्तावर दीपक याच्या नावाने महानगर पालिकेने दंडाची पावती फाडली. 

याप्रकरणी  विराट कोहलीच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्याजवळ अनेक गाड्या आहेत. त्यामध्ये दोन एसयूव्ही आहेत. या गाड्या रोज महानगर पालिकेच्या पाईपमधून येणाऱ्या पाण्याने धुतल्या जातात. त्यामुळे दररोज शेकडो लीटर पाणी वाया जाते. यावर शेजाऱ्यांनी बऱ्याचवेळा आक्षेप घेत असे न करण्याचा सल्ला दिला. मात्र, विराट कोहलीचा मदतनीस दीपक आणि त्याच्या कार चालकांवर काहीही फरक पडला नाही. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर महानगर पालिकेचे अधिकारी जेई अमन फोगाट यांनी सांगितले की, 'पाणी वाया घालवल्याप्रकरणी जवळपास 10 अन्य लोकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.' 

दरम्यान, विराट कोहली सध्या वर्ल्डकपसाठी इंग्लड दौऱ्यावर आहे. काल झालेल्या वर्ल्डकपमधील सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 6 विकेट्सनी नमवून टीम इंडियानं विजयी सलामी दिली. या सामन्यात भेदक गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना 227 धावा करता आल्या. टीम इंडियाने हे आव्हान 6 विकेट्स राखत पूर्ण केले आणि विजयी सलामी दिली. दक्षिण आफ्रिकेला मात्र या विश्वचषकात पराभवाची हॅट्ट्रिक पत्करावी लागली. सामनावीर रोहित शर्माने 13 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 122 धावांची खणखणीत खेळी साकारली.

टॅग्स :विराट कोहलीवर्ल्ड कप 2019