Join us  

आयपीएल २०२० : अंतिम सामना पुढे ढकलणार

बीसीसीआयसाठी आयपीएलचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे म्हटले जात असले तरी आयपीएलच्या आयोजनात एक महत्त्वाची अडचण आहे. ही अडचण म्हणजे भारत सरकारची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत आयपीएल खेळवण्यात येऊ शकत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 4:38 AM

Open in App

मुंबई : यंदा संयुक्त अरब अमिरात येथे प्रस्तावित असलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२०च्या वेळापत्रकात बदल शक्य होणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना दोन दिवसानी पुढे ढकलण्यात येणार आहे.

यापूर्वी आयपीएलचे आयोजन १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार होते. अंतिम सामना ८ नोव्हेंबरला खेळवण्यात होणार होता. ८ ऐवजी १० नोव्हेंबरला अंतिम सामना होणार असल्याचे समजते .

दिवाळीच्या आठवड्यात आयपीएलचे सामने अंतिम टप्प्प्यात असायला हवे, अशी प्रसारणकर्ते स्टार इंडियाची मागणी होती. यामुळे टीव्ही प्रेक्षकांच्या संख्येत भर पडेल शिवाय जाहिरातदार वाढतील, असा यामागे तर्क होता. बीसीसीआयने मात्र याकडे दुर्लक्ष केले. तथापि आता त्यांचाही आग्रह लक्षात घेत अंतिम सामना ८ ऐवजी १० नोव्हेंबरला खेळविण्यावर येत्या तीन दिवसात अंतिम निर्णय होईल, असे दिसते. बीसीसीआयच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक २ आॅगस्ट रोजी होणार आहे.

यामागील दुसरे कारण असे की यूएईत अंतिम सामना खेळल्यानंतर भारतीय खेळाडू दिवाळीसाठी भारतात परतणार होते. मात्र आता १० नोव्हेंबर रोजी अंतिम सामना आटोपताच खेळाडू घरी न परतता यूएईतून थेट आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होतील, असे मानले जाते. आयसीसीने विश्वचषक आणि बीसीसीआयने आयपीएलसाठी आशिया चषक रद्द केला. त्यानंतर आयपीएल १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळवणार असल्याचे निश्चित झाले. यूएईमध्ये अबूधाबी, दुबई आणि शारजा येथे आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. यूएईच्या क्रिकेट मंडळानेही आपल्याला बीसीसीआयचे स्वीकृतीपत्र मिळाल्याचे सांगितले. त्यामुळे आता आयपीएल यूएईमध्येच होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

बीसीसीआयसाठी आयपीएलचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे म्हटले जात असले तरी आयपीएलच्या आयोजनात एक महत्त्वाची अडचण आहे. ही अडचण म्हणजे भारत सरकारची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत आयपीएल खेळवण्यात येऊ शकत नाही. भारत सरकारने जर आयपीएलला परवानगी दिली नाही तर आयपीएल होऊ शकत नाही, हे नक्की. बीसीसीआय आयपीएलसाठी भारत सरकारची परवानगी कशी मिळवणार, याकडे लक्ष लागले आहे. (वृत्तसंस्था)

चॅम्पियन बनविण्यात आयपीएलची महत्त्वपूर्ण भूमिका - मोर्गन

चेन्नई : इंग्लंड संघातील माझ्या सहकाऱ्यांनी २०१९ च्या आयपीएलमध्ये ठरलेल्या योजनेनुसार भाग घेतल्याचे सांगून विश्वचषकाचे पहिल्यांदा जेतेपद पटकावण्यात आयपीएलची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली, असे इंग्लंडचा कर्णधार इयोन मोर्गन म्हणाला. विश्वचषकातील दडपणाची बरोबरी केवळ आयपीएलसारख्या स्पर्धेमध्येच होईल, असे ईसीबी निवड समितीचे अध्यक्ष अँड्रयू स्ट्रॉस यांना सांगितले होते, असा खुलासा मोर्गनने केला. मोर्गन म्हणाला, ‘आयपीएल खेळणे स्ट्रॉस यांच्या योजनेचा भाग होता. कारण विश्वचषकसारख्या स्पर्धांमध्ये असणारे दडपण कमी करण्यासाठी आयपीएलसारखी स्पर्धा खेळणे योग्य आहे, असे वाटत होते.’

टॅग्स :आयपीएल 2020