- सौरव गांगुली
मागील काही दिवसांपासून ईडनवर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सप्टेंबरमध्ये धो-धो बरसणे यात नवे काहीच नाही. तरीही पावसाच्या हजेरीनंतर ईडनला खेळण्यायोग्य बनविण्याच्या प्रक्रियेला विलंब होत नाही, हे विशेष. मागच्या दोन वर्षांपासून मैदान कर्मचा-यांनी ईडनवर खूप मेहनत घेतली. यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा, विकेटवरील कव्हर, मैदानाची देखभाल आदी गोष्टी सुलभ झाल्या. मागच्या वर्षी आम्ही येथे न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्याचे यजमानपद भूषविले. भारत - आॅस्ट्रेलिया सामनादेखील पूर्ण षटकांचा होईल, याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही.
ईडनची खेळपट्टी चेन्नईच्या तुलनेत वेगळी आहे. या मैदानावर वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहील. मागच्या तीन दिवसांत कोसळलेल्या पावसामुळे वेगवान माºयास अनुकूल वातावरण असेल. सामना सुरू होण्याच्या काही तास आधी कडक उन्ह पडले तर विकेट टणक बनते. तरीही वेगवान गोलंदाजांना येथे विकेट मिळण्याची शक्यता अधिक राहील.
नाणेफेक जिंकल्यानंतर येथे आधी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो. यामागे दोन कारणे आहेत. एकतर विकेट टणक आहे आणि दुसरे कारण हवामान. आॅस्ट्रेलियासाठी हा सामना महत्त्वपूर्ण असेल. हा संघ ०-२ ने माघारल्यास मुसंडी मारणे त्यांना कठीण जाईल. या सामन्यात उभय संंघांना अतिरिक्त गोलंदाज खेळविण्याची संधी असेल. चेन्नईत भारताने दोन फिरकीपटू खेळविले. येथे अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळविण्याचा विचार करावा.
पाहुण्या संघाबाबत सांगायचे झाल्यास ट्रॅव्हीस हेड आणि मार्कस् स्टोयनिस यांनी चेन्नईत फिरकीची बाजू सांभाळली होती. ते आणखी एक फिरकी गोलंदाज खेळवू शकतात. याशिवाय फलंदाजीत पीटर हँड्सकोम्ब आणि मॅथ्यू वेड यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. हँड्सकोम्ब फिरकीला समर्थपणे तोंड देतो, शिवाय तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. भारताचा भक्कम सामना करण्यासाठी आॅस्ट्रेलिया संघाला सर्वच आघाड्यांवर प्रभावी कामगिरी करणे गरजेचे आहे. (गेमप्लान)