Join us  

15 सेकंद आधीच स्क्रीनवर रिप्ले दाखवणे महागात, डीआरएस निर्णयावर कोहलीची तीव्र नाराजी

DRS News : अखेरच्या सामन्यात मॅथ्यू वेड फलंदाजी करत असताना डीआरएसचा निर्णय घेण्यावरुन विराट आणि पंचांमध्ये मैदानात राडा झाला होता नटराजनच्या गोलंदाजीवर मॅथ्यू वेड पायचित असल्याचे अपील भारताने केले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 4:23 AM

Open in App

सिडनी : ‘मॅथ्यू वेड याला टाकण्यात आलेला चेंडूचा रिप्ले मोठ्या स्क्रीनवर १५ सेकंद आधीच दाखविण्यात आल्यामुळे आमचा संघ डीआरएस घेऊ शकला नाही,’ यावरुन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने पंचाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अखेरच्या टी-२० सामन्यात भारताला १२ धावांनी पराभूत करण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले.  १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना  कोहलीने ८५ धावांची आक्रमक खेळी केली. सहकारी फलंदाजांची साथ न लाभल्याने  भारताला पराभवाचा सामना करावा लागला. अखेरचा सामना भारताने गमावला असला तरीही टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारण्यात भारत यशस्वी ठरला.अखेरच्या सामन्यात मॅथ्यू वेड फलंदाजी करत असताना डीआरएसचा निर्णय घेण्यावरुन विराट आणि पंचांमध्ये मैदानात राडा झाला होता नटराजनच्या गोलंदाजीवर मॅथ्यू वेड पायचित असल्याचे अपील भारताने केले. पंचांनी अपील नाकारल्यानंतर भारताने डीआरएसचा निर्णय घ्यायच्या आधीच मैदानावरील टीव्ही स्क्रीनवर त्या बॉलचा रिप्ले दाखवण्यात आला. भारताला डीआरएसची संधी नाकारण्यात आली. विराट कोहलीने यावर नाराजी व्यक्त केली. ‘तो निर्णय खरोखर आश्चर्यकारक होता. आम्ही डीआरएस घ्यायचा की नाही याबद्दल चर्चा करत होतो, १५ सेकंदांचा वेळ होता आणि तेवढ्यात स्क्रीनवर रिप्ले दाखवण्यात आला. पण ज्यावेळी आम्ही डीआरएसची मागणी केली त्यावेळी पंचांनी ती नाकारली. मी चर्चा केली त्यावेळी पंचांनी अशा परिस्थितीत आपल्याला काही करता येणार नाही असे सांगितले. ते १५ सेकंद आम्हाला पुढे चांगलेच महागात पडले,’असे विराटने सामना संपल्यानंतर  पत्रकार परिषदेत सांगितले. 

‘मी पंच रॉड टकर यांच्याशी हुज्जत घातली. अशास्थितीत काय केले जाऊ शकते अशी विचारणा केली तेव्हा मी काहीच करू शकत नाही, तो टीव्हीचा दोष आहे,असे त्यांनी सांगितले. भारतीय व्यवस्थापनाने स्थानिक अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त करीत आंतरराष्ट्रीय सामन्यात अशा चुका खपवून घेतल्या जाणार नाहीत,असे बजावले. टीव्ही चमूची एक चूक इतकी महागडी ठरू शकते. भविष्यात असे घडणार नाही,अशी अपेक्षा व्यक्त करतो.’- विराट कोहली, कर्णधार

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहली