Join us
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिका-यांचा खर्च कोटींच्या घरात

प्रशासकांच्या समितीने (सीओए) सर्वोच्च न्यायालयाकडे सोपविलेल्या पाचव्या स्थिती अहवालात बीसीसीआयच्या पदाधिका-यांनी केलेल्या खर्चाचे विवरण सादर केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 04:03 IST

Open in App

नवी दिल्ली : प्रशासकांच्या समितीने (सीओए) सर्वोच्च न्यायालयाकडे सोपविलेल्या पाचव्या स्थिती अहवालात बीसीसीआयच्या पदाधिका-यांनी केलेल्या खर्चाचे विवरण सादर केले. त्यानुसार काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी यांनी १.५६ कोटींचा तसेच कोशाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी १.७१ कोटींचा खर्च केला. या खर्चामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.या खर्चात विमान प्रवास, टीए, डीए, निवास, विदेश विनिमय भत्ते, आदींचा समावेश आहे. २०१५-१६ आणि २०१६-१७ तसेच सध्याच्या आर्थिक वर्षांत एप्रिल ते जूनपर्यंत झालेला हा खर्च आहे. रांची येथे वास्तव्यास असलेले माजी आयपीएस अधिकारी अमिताभ चौधरी यांच्या विमान प्रवासावर ६५ लाख, टीए तसेच डीएवर ४२.२५ लाख तसेच विदेशात बीसीसीआयचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल २९ लाख रुपयांचा खर्च झाला. हॉटेल तसेच अन्य ठिकाणी वास्तव्याचा त्यांचा खर्च १३.५१ लाख कार्यालयीन खर्च ३.९३ लाख इतका असून त्यांना १,३१,४२१ इतकी रक्कम अतिरिक्त देण्यात आली आहे. अमिताभ यांच्यावर झालेल्या खर्चाचा एकूण आकडा १,५६,०१,९९३ कोटी इतका आहे.कोशाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांचा विमान प्रवास खर्च ६०,२९,२१० रुपये असून त्यांनी ७५ लाख इतका डीए उचलला आहे. विदेशात त्यांच्यावर १७.६४ लाख विनिमय स्वरूपात खर्च झाले असून निवासावर ११ लाख खर्च झाले. अनिरुद्ध यांच्यावर १,७१,५८,३३० रुपये खर्च करण्यात आला. दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाने निलंबित केलेले माजी सचिव अजय शिर्के यांनी इतर पदाधिकाºयांप्रमाणे बीसीसीआयकडे एका पैशाचीही मागणी केली नव्हती़माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सध्याचे काळजीवाहू प्रमुख सी. के. खन्ना यांच्यावर त्यातुलनेत झालेला खर्च कमी आहे. ठाकूर यांनी बाहेर जाण्यासाठी २४ लाख, तर खन्ना यांनी या काळात ६.५२ लाख रुपये खर्च केले.