Join us

Exclusive : घरातून विरोध असूनही जसप्रीत बुमरा बनला टॉप बॉलर; जाणून घ्या रहस्य

लोकमत डॉट कॉम'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बुमराने यशाचे रहस्यही उलगडले आहे.

By प्रसाद लाड | Updated: September 13, 2019 18:46 IST

Open in App

मुंबई : तुमच्याकडे गुणवत्ता, चिकाटी आणि अथक मेहनत घेण्याची त्रिसूत्री असली की, तुमचे स्वप्न तुम्ही सत्यात उतरवू शकता. लहानपणी त्यानेही एक स्वप्न पाहिले. क्रिकेटपटू होण्याचे. घरातून त्याला विरोध झाला. कारण वडिल व्यावसायिक होते. आई शिक्षिका. घरात यापूर्वी कुणी मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळलं नव्हतं. त्यामुळे क्रिकेटमध्ये तुझं कसं होणार? असा प्रश्न विचारत त्याला विरोध केला गेला. पण त्याने आपले हे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला होता. तो प्रामाणिकपणे खेळत गेला आणि यशाची एकामागून एक पायरी चढत गेला. सध्याच्या घडीला तो क्रिकेट विश्वातला सर्वोत्तम वेगवान गोलंदाज ठरला आहे. ही कहाणी आहे भारताचा युवा वेगवान गोलंदाज आणि 'यॉर्कर मास्टर' ही बिरुदावली मिरवणाऱ्या जसप्रीत बुमराची. 'लोकमत डॉट कॉम'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बुमराने यशाचे रहस्यही उलगडले आहे. रॉयल स्टॅग या कंपनीने आपल्या संघामध्ये बुमराचा आज समावेश केला. त्यावेळी बुमराने विशेष मुलाखतीमध्ये काही प्रश्नांची उत्तरे दिली.

आपल्या या साऱ्या गोष्टींचा उलगडा बुमराने यावेळी केला. आपल्या स्ट्रगलबद्दल बुमरा म्हणाला की, "लहान असताना माझ्या घरातून क्रिकेटला विरोध होता. भरपूर जणं क्रिकेट खेळतात. त्यामध्ये जास्त स्पर्धा असते. त्यामुळे क्रिकेटमध्ये कसं चांगलं करीअर होऊ शकतं? मला मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळायला मिळेल किंवा नाही, अशी माझ्या आईला भिती होती. त्यामुळे तिचा क्रिकेटला विरोध होता. पण विरोध म्हणजे क्रिकेट खेळायचंच नाही, असं आईचं म्हणणं नव्हतं. आपण जे काही करतोय, त्यामध्ये जर अपयशी ठरलो, तर पुढे काय करायचं, हा बॅकअप प्लॅनही तुमच्याकडे असायला हवा, असं आईचं म्हणणं होतं. क्रिकेट हे माझं स्वप्न होतं. तुम्ही स्वप्न बघायला शिकायला हवं, पण त्याचबरोबर तुम्ही सर्वोत्तम कामगिरी करत ते सत्यात उतरवणं सर्वात महत्वाचं असतं."

जसप्रीतच्या वडिलांचे तो सात वर्षांचा असताना निधन झाले. त्याचे बाबा व्यावसायिक होते. त्यामुळे त्यांच्यानंतर तु घरच्या व्यवसायाकडे का वळाला नाहीस, असे विचारल्यावर बुमरा म्हणाला की, "व्यवसाय करायचा की नाही, हा मी कधीच विचार केला नाही. कारण माझं पहिलं प्रेम हे क्रिकेट होतं. मी टीव्हीवर क्रिकेट पाहायचो. टेनिस बॉलने खेळायचो. आणि हेच स्वप्न मला जगायचं होतं. त्यामुळे मी कधीही क्रिकेट माझ्यापासून वेगळं केलं नाही. मेहनत घेत गेलो आणि प्रत्येकवेळी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या साऱ्या गोष्टींमुळे मला यश मिळत गेलं."

यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो...आता मला सारे विचारतात की, तुझ्या यशाचे रहस्य काय? मी त्यांना फक्त एवढंच सांगू इच्छितो की, तुम्ही यशाच्या मागे धावत राहीलात तर ते तुम्हाला मिळणार नाही. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. प्रत्येक गोष्टीची प्रोसेस असते, त्यामधून तुम्हाला जावेच लागते. जोपर्यंत ही प्रोसेस कमी होत नाही, तोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही. यश मिळाल्यावरही ते कसं टिकून ठेवायचं, यामध्ये सर्वात जास्त कसब लागतं, असं बुमरा म्हणाला.

टॅग्स :जसप्रित बुमराह