Join us

...तर उपखंडाबाहेरही यश मिळवता येईल

भारताने श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याची औपचारिकता सोमवारी तिसºयाच दिवशी पूर्ण केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 10:14 IST

Open in App

- सुनील गावसकर भारताने श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याची औपचारिकता सोमवारी तिस-याच दिवशी पूर्ण केली. भारताने विदेशात प्रथमच क्लीन स्वीपची नोंद केली. यापूर्वी १९६८ मध्ये न्यूझीलंडमध्ये भारताने तीन कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. पण ती मालिका चार सामन्यांची होती आणि यजमान संघाने एक सामना जिंकला होता.कुलदीप यादवने पहिल्या डावात बळी घेतले, तर दुसºया डावात रविचंद्रन आश्विनने ती भूमिका बजावली. दुसºया डावात आश्विनने भारतातर्फे सर्वाधिक बळी घेतले. मोहम्मद शमीने तिखट मारा करताना चेंडू दोन्ही बाजूला स्विंग केला. त्याने बाऊन्सरचा चपखल वापर केला.खेळपट्टी गोलंदाजांना विशेष अनुकूल नसताना श्रीलंकेची कामगिरी सुमार ठरली. त्यामुळे श्रीलंकेच्या फलंदाजांच्या टेम्परामेंटवर प्रश्न उपस्थित होतो. करुणारत्नेचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना कसोटी क्रिकेटमध्ये डाव कसा साकारला जातो, याची कल्पना नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आश्विन व शमी यांचे काम सोपे झाले. करुणारत्ने एका अचानक उसळलेल्या चेंडूवर बाद झाला. कर्णधार दिनेश चांदीमल व माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अन्य फलंदाजांनी मात्र सपशेल नांगी टाकली. शिखर धवन व चेतेश्वर पुजारा यांची फलंदाजी आणि शमी, आश्विन व जडेजा यांची गोलंदाजी यासाठी ही मालिका भारतीय संघाच्या आठवणीत राहील. दोन युवा खेळाडू हार्दिक पांड्या व कुलदीप यादव यांनी आपली निवड सार्थ ठरविली. त्यांनी प्रतिभेची चुणूक दाखविली असून भविष्यात भारताला त्यांच्याकडून मोठ्या कामगिरीची आशा आहे.उपखंडाबाहेरच्या मालिका भारतीय संघासाठी खडतर राहणार आहे, पण भारताने विजयी मोहीम कायम राखली तर उपखंडाबाहेरही भारताला जल्लोष साजरा करता येईल. भारतीय संघात एकी दिसून येत असून कर्णधार विराट कोहली सर्व खेळाडूंना समान वागणूक देत असल्याचे निदर्शनास येते. निवड समिती सदस्यांसाठी संघाची निवड करताना डोकेदुखी वाढली आहे. विशेषत: सलामीवीर आणि वेगवान गोलंदाजांची निवड करणे निवड समितीसाठी सुसह्य डोकेदुखी आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या संघाविरुद्ध श्रीलंका संघाची तुलनाच होणे शक्य नाही.(पीएमजी)