Join us  

ENGvPAK : पाकिस्तान करायला गेला पराक्रम, चार तासांत नोंदवला लाजीरवाणा विक्रम

इंग्लंड दौऱ्यावरील पाकिस्तान संघाच्या लाजीरवाण्या पराभवाची मालिका चौथ्या सामन्यातही कायम राहीली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 11:16 AM

Open in App

नॉटिंगहॅम, इंग्लंड वि. पाकिस्तान : इंग्लंड दौऱ्यावरील पाकिस्तान संघाच्या लाजीरवाण्या पराभवाची मालिका चौथ्या सामन्यातही कायम राहीली. इंग्लंडने चौथ्या वन डे सामन्यात 341 धावांचे लक्ष्य सहज पार करताना पाच सामन्यांची मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 340 धावांचा डोंगर उभा केला आणि कोणीही न केलेला विक्रम नावावर केला. मात्र, चार तासांत त्यांच्या या पराक्रमाचे रुपांतर लाजीरवाण्या विक्रमात झाले.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हकच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली आणि त्याला सामन्यातून माघार घ्यावी लागली. मार्क वूडच्या गोलंदाजीवर स्क्वेअर लेगला फटका मारताना इमामच्या कोपऱ्याला ही दुखापत झाली. त्यानंतर तो वेदनेने मैदानावर विव्हळत होता. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याची दुखापत गंभीर नसल्याचे नंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले. 

त्यानंतर फाखर झमान ( 57) आणि बाबर आझम ( 115) यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. त्यांना मोहम्मद हाफिज ( 59) आणि शोएब मलिक ( 41) यांची उत्तम साथ लाभली. या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर पाकिस्तानने 7 बाद 340 धावा केल्या. या कामगिरीसह सलग तीन वन डे सामन्यांत 340+ धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानने नावावर केला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच संघ ठरला. इंग्लंडच्या टॉम कुरणने चार विकेट घेतल्या.

पण, अवघ्या चार तासांत त्यांच्या या पराक्रमाचे रुपांतर लाजीरवाण्या विक्रमात झाले. जेसन रॉय ( 114), बेन स्टोक्स ( 71*),  जेम्स व्हिंस ( 43), जो रूट ( 36) आणि टॉम कुरण ( 31) यांनी इंग्लंडला विजय मिळवून दिला. इंग्लंडने 3 विकेट व 3 चेंडू राखून हा सामना जिंकला आणि मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. इंग्लंडच्या या विजयाने पाकिस्तानला लाजीरवाण्या विक्रमाचा सामना करावा लागला. 340+ धावा करूनही सलग तीन सामन्यांत पराभव पत्करणारा तो पहिलाच संघ ठरला. हा त्यांचा चौथ्या सर्वात मोठा पराभव ठरला.  

 

टॅग्स :इंग्लंडपाकिस्तान