लीडस् : इंग्लंडवर विश्वचषकात मिळालेला विजय संघाचे मनोबल उंचावणारा असल्याचे मत श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने याने व्यक्त केले.
मागील काही सामन्यात श्रीलंका थोडा विखुरलेला वाटला. तथापि या विजयानंतर संघात उत्साह संचारला असून पुढील सामन्यात आणखी एकजुटीने खेळणे शक्य होणार असल्याचे माहेलाने आयसीसीसाठी लिहिलेल्या स्तंभात म्हटले आहे. तो पुढे लिहितो, ‘या विजयानंतर आयसीसी विश्वचषकात आमच्या खेळाडूंमध्ये उत्साह संचारणार आहे. जगातील अव्वल संघांपैकी एक असलेल्या इंग्लंडला धक्का दिल्यामुळे लंकेच्या खेळाडूंचा स्वत:वरील विश्वास आणखी पक्का झाला आहे. याआधी अनेकदा असे वाटायचे की आमचे खेळाडू थोडे भय बाळगून खेळत आहेत. ते स्वत:ला मोकळेपणे व्यक्त करू शकत नव्हते. या विजयानंतर संघाच्या वागणुकीत बदल होईलच शिवाय खेळाडूंची देहबोली देखील बदलणार आहे.’
माजी कर्णधार लसिथ मलिंगाच्या माऱ्याची प्रशंसा करीत माहेला म्हणाला, ‘लसिथने इंग्लंडवरील विजयात स्वत:च्या चेंडूचे कौशल्य सिद्ध केले. त्याने इतकी वर्षे लंकेसाठी बरेचदा अशी कामगिरी केली पण सर्वोत्कृष्ट कामगिरी करताना त्याला पाहणे सुखद ठरले.’ (वृत्तसंस्था)