गॉल - यष्टीरक्षक फलंदाज बेन फोक्स याच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत पहिल्या डावात १३९ धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात ३४२ धावा केल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी श्रीलंकेचा पहिला डाव २०३ डावात गुंडाळला.
बेन फोक्सने पदार्पणात १०७ धावा केल्या. आपल्या पहिल्या कसोटीत शतक करणारा तो पाचवा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. जखमी बेअरस्टाच्या जागी समावेश करण्यात आलेल्या बेनने कालच्या ८७ धावांवरुन खेळण्यास प्रारंभ केला. त्याच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने ३४२ धावा केल्या. फोक्सने २०२ चेंडू खेळताना १० चौकारांसह आपली खेळी सजवली. लंकेच्या दिलरुवान परेराने ७५ धावांत अर्धा संघ बाद करत चांगला मारा केला.
यानंतर इंग्लंडने श्रीलंकेचा डाव २०३ धावांतच गुंडाळत निर्णायक शतकी आघाडी घेतली. अंजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक ५२ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणालाही फारशी छाप पाडता आली नाही. इंग्लंडकडून मोईल अलीने चार, तर जॅक लीच व आदिल रशिद यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. पहिल्या डावात इंग्लंडला मर्यादित धावसंख्येत गुंडाळल्यानंतर यजमान श्रीलंकेला त्याचा फायदा घेण्यात यश आले नाही.
दुसऱ्या डावात सावध सुरुवात केलेल्या इंग्लंडने बिनबाद ३८ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता इंग्लंडकडे एकूण १७७ धावांची आघाडी आहे. रोरी बर्न्स ११, तर जेनिंग्ज २६ धावांवर खेळत आहेत. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : ९७ षटकात सर्वबाद ३४२ धावा (बेन फोक्स १०७, सॅम कुरन ४८, केटॉन जेनिंग्स ४६; दिलरुवान परेरा ५/७५.)
श्रीलंका (पहिला डाव) : ६८ षटकात सर्वबाद २०३ धावा (अँजेलो मॅथ्यूज ५२, दिनेश चंदीमल ३३; मोइन अली ४/६६.)
इंग्लंड (दुसरा डाव) : १२ षटकात बिनबाद ३८ धावा (रोरी बर्न्स खेळत आहे ११, केटॉन जेनिंग्स खेळत आहे २६.)