Join us  

इंग्लंडचा श्रीलंकेला ‘क्लीन स्वीप’; कसोटी मालिका २-० ने जिंकली

दुसऱ्या सामन्यात ६ गड्यांनी मात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 5:43 AM

Open in App

गॉल : इंग्लंडने श्रीलंकेला दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी सहा गड्यांनी नमवून दोन सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली. लंकेने दिलेले १६४ धावांचे लक्ष्य इंग्लंडने सोमवारी चार गड्यांच्या मोबदल्यात गाठले. डॉम सिबली ५६ तर जोस बटलर ४६ धावा काढून नाबाद राहिले. लंका संघ दुसऱ्या डावात अवघ्या १२६ धावात बाद होताच इंग्लंडने विजयाकडे कूच केली होती.

चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होताच इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ३४४ धावात बाद झाला. यजमान संघाला पहिल्या डावात ३७ धावांची आघाडी मिळाली होती. इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी लंकेच्या फलंदाजांना स्थिरावण्याची संधी न देता सर्व दहा गडी बाद केले. कुसाल परेरा १९ धावांवर बाद झाल्यापासून गळती सुरू झाली. अखेर १२६ धावात दुसरा डाव संपुष्टात आला.

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडने जॅक क्रॉलेच्या (१३) रूपात पहिला गडी गमावला. जॉनी बेयरेस्टो (२९) आणि ज्यो रुट (११) हे लवकर बाद झाल्यानंतर डॉम सिबली आणि बटलर यांनी संधी न देता विजयावर शिक्कामोर्तब केले. लंकेकडून एम्बुलदेनिया याने तीन गडी बाद केले. त्याआधी, इंग्लंडने श्रीलंकेला दुसऱ्या डावात अवघ्या १२६ धावात गुंडाळल्याने विजयासाठी १६४ धावांचे लक्ष्य मिळाले होते. लंकेच्या ३८१ धावांना उत्तर देणाऱ्या इंग्लंडने पहिल्या डावात २४४ धावांपर्यंत मजल गाठली होती. एम्बुलडेनियाने १३७ धावात इंग्लंडचे ७ गडी बाद केले होते. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून फिरकीपटू लीच आणि  बेस यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले. कर्णधार रूटने सलग दोन चेंडूंवर गडी बाद करीत लंकेचा डाव संपुष्टात आणला. अशा प्रकाराने सर्व दहा गडी फिरकी गोलंदाजांनी बाद केले. लेसिथ एम्बुलडेनिया याने ४२ चेंडूत सर्वाधिक ४० धावा केल्या.

असाही विक्रम...कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच असा विक्रम झाला. ज्या गोलंदाजांनी पहिल्या डावात १० गडी बाद केले, त्यापैकी एकालाही दुसऱ्या डावात गडी बाद करता आला नाही. शिवाय दुसऱ्या डावात ज्या गोलंदाजांनी मिळून दहा बळी मिळवले, त्यांना पहिल्या डावात एकही बळी मिळाला नव्हता. याआधी ओव्हल मैदानावर २०१९ साली इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात पहिल्या डावात इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर (६), सॅम कुरेन (३) आणि ख्रिस वोक्सने (१) गडी बाद केले होते. तर दुसऱ्या डावात स्टुअर्ट ब्रॉड (४), जॅक लीच (४) आणि ज्यो रुट (२) यांनी बळी मिळवले होते.

संक्षिप्त धावफलकश्रीलंका पहिला डाव : सर्वबाद ३८१ आणि दुसरा डाव : सर्वबाद १२६ धावा. इंग्लंड पहिला डाव : सर्वबाद ३४४ आणि दुसरा डाव : ४२.३ षटकात ४ बाद १६४ धावा. (डॉम सिबली नाबाद ५६, जोस बटलर नाबाद ४६, जॉनी बेयरेस्टो २९) गोलंदाजी : एम्बुलदेनिया ३/७३, रमेश मेंडिस १/४८. 

टॅग्स :इंग्लंडश्रीलंका