दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाचे (इसीबी) अभिनंदन केले आहे. इंग्लंडचा पुरुष संघ बुधवारपासून एजबस्टनमध्ये भारताविरुद्ध १००० वा कसोटी सामना खेळण्याची तयारी करीत आहे. इंग्लंड पुरुष संघाने आतापर्यंत ९९९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात ३५७ सामन्यांत विजय मिळवला, तर २९७ सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. ३४५ सामने अनिर्णीत संपले. इंग्लंड संघाने पहिला कसोटी सामना मार्च १८७७ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.
इंग्लंडने एजबस्टनमध्ये आपला पहिला कसोटी सामना १९०२ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून संघाने येथे ५० कसोटी सामने खेळले आहेत. त्यात २७ सामने जिंकले, तर ८ सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. १५ सामने अनिर्णीत संपले. आयसीसी चेअरमन शशांक मनोहर म्हणाले, ‘क्रिकेट परिवारातर्फे इंग्लंडला त्यांच्या १००० व्या पुरुष कसोटी सामन्यासाठी शुभेच्छा देतो. अशी कामगिरी करणारा तो पहिला संघ ठरणार आहे. मी या ऐतिहासिक कसोटीसाठी इंग्लंडला शुभेच्छा देतो. इंग्लंड खेळाच्या या सर्वांत जुन्या प्रारूपामध्ये समर्थकांना प्रेरित करण्यासाठी दर्जेदार कामगिरी करेल आणि दिग्गज खेळाडू निर्माण करेल, अशी आशा आहे.’
या वेळी न्यूझीलंडचे माजी कर्णधार व आयसीसी मॅच रेफरीच्या एमिरेट््स एलीट पॅनलचे जेफ क्रो आयसीसीतर्फे ईसीबीचे अध्यक्ष कोलिन ग्रेव्स यांना कसोटीला प्रारंभ होण्यापूर्वी रौप्य पट्टिका प्रदान करतील.
जून १९३२ मध्ये पहिल्या कसोटी सामन्यापासून इंग्लंडने भारतावर वर्चस्व गाजवले आहे. उभय संघांदरम्यान ११७ कसोटी सामने खेळल्या गेले असून, इंग्लंडने ४३ मध्ये विजय मिळवला आहे, तर २५ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. गृहमैदानावर इंग्लंडने ३०, तर भारताने ६ सामन्यांत विजय मिळवला आहे. उभय संघांदरम्यान २१ कसोटी सामने अनिर्णीत संपले आहेत. एजबस्टनमध्ये उभय संघांदरम्यान सहा कसोटी सामने खेळल्या गेले आहेत. त्यात इंग्लंडने ५ जिंकले असून एक सामना अनिर्णीत राहिला. (वृत्तसंस्था)