Join us  

England vs West Indies : विंडीजनं इंग्लंडला नमवलं; यजमानांच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

वेस्ट इंडिजच्या शॅनोन गॅब्रीएलनं दोन्ही डावांत मिळून घेतल्या 9 विकेट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 10:12 AM

Open in App

कोरोनाच्या संकटात सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिज संघानं विजयाचा मान पटकावला. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेले 200 धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजनं 4 विकेट्स राखून सहज पार केले. जेरमेन ब्लॅकवूड ( 95) हा या विजयाचा शिल्पकार ठरला. या पराभवामुळे इंग्लंडच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला.

नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, विंडीज गोलंदाजांसमोर त्यांच्या खेळाडूंनी शरणागती पत्करली. विंडीज कर्णधार जेसन होल्डर आणि शेनॉन गॅब्रीएल यांनी अनुक्रमे 6 व 4 विकेट्स घेत इंग्लंडचा पहिला डाव 204 धावांत गुंडाळला. बेन स्टोक्स ( 43) आणि जोस बटलर ( 35) यांनी संघर्ष केला. वेस्ट इंडिजनं प्रत्युत्तरात 318 धावा करताना 114 धावांची आघाडी घेतली. क्रेग ब्रेथवेट ( 65), शेन डॉवरीच ( 61) आणि रोस्टन चेस ( 47) यांनी दमदार खेळ केला. बेन स्टोक्सनं या सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याला जेम्स अँडरसननं तीन विकेट घेत चांगली साथ दिली. 

इंग्लंडने दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली. रोरी बर्न्स ( 42) आणि डॉम सिब्ली ( 50) यांनी दमदार सुरुवात करून दिली. झॅक क्रॅवली ( 76) आणि कर्णधार बेन स्टोक्स (46) यांनी संघर्ष केला, परंतु विंडीजच्या गोलंदाजांनी यजमानांना झटके दिले. इंग्लंडचा दुसरा डाव 313 धावांत गुंडाळला. शॅनोन गॅब्रीएलनं 5 विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात निराशाजनक झाली. पण, ब्लॅकवूडनं एकाकी खिंड लढवून विंडीजचा विजय पक्का केला. विंडीजनं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दोन किंवा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभूत होण्याची परंपरा इंग्लंडने याही मालिकेत कायम राखली. 2019पासून त्यांना ब्रिजटाऊन ( वि. वेस्ट इंडिज), बर्मिंगहॅम ( अॅशेस), माऊंट मौंगानूई ( वि. न्यूझीलंड), सेंच्युरियन ( वि. दक्षिण आफ्रिका) आणि साऊदॅम्प्टन ( वि. वेस्ट इंडिज) यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आहे. मागील 10 कसोटी मालिकेत 8 वेळा इंग्लंड पहिला सामना पराभूत झाला आहे.   

टॅग्स :इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिजवेस्ट इंडिज