Join us  

पाकिस्तानचा पोपट झाला; 3911 दिवसांनी फलंदाजाला दिली संधी, पण त्याला फोडता आला नाही 'भोपळा'!

England vs Pakistan, 2nd Test : यजमान इंग्लंडनं दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 10:30 AM

Open in App

England vs Pakistan, 2nd Test : यजमान इंग्लंडनं दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवलं. पाकिस्तानचा निम्मा संघ 126 धावांवर माघारी पाठवून इंग्लंडनं कसोटीची दणक्यात सुरूवात केली. या सामन्यात पाकिस्ताननं तब्बल 3911 दिवसांनी आपल्या फलंदाजाला संघात पुन्हा स्थान दिले. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते, परंतु अवघी चार चेंडू खेळून तो माघारी परतला आणि पाकिस्तानचा डाव फसला... ख्रिस वोक्सनं त्याला चौथ्या चेंडूवर पायचीत केलं..

दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं संघात दोन बदल केले. बेन स्टोक्स अन् जोफ्रा आर्चरच्या जागी इंग्लंडनं झॅक क्रॅवली अऩ् सॅम करनला संधी दिली. पाकिस्तानच्या संघात फवाद आलमला संधी देण्यात आली. त्यांनी शाबाद खानला संघातून वगळलं. 10 वर्ष, 8 महिने अन् 16 दिवसांनी त्यानं संघात पुनरागमन केलं. 24-28 नोव्हेंबर 2009 नंतर आलमनं पाकिस्तानच्या कसोटी संघात पुनरागमन केलं. जुलै 2009मध्ये फवादनं पाकिस्तान संघाकडून पदार्पण केलं आणि तीन सामने खेळल्यानंतर त्याला डच्चू देण्यात आला. या दहा वर्षांत पाकिस्तान संघानं 88 कसोटी सामने खेळले आणि गुरुवारी फवादला पुनरागमनाची संधी दिली.  

पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या कसोटीतील शतकवीर शान मसूदला ( 1) जेम्स अँडरसननं तिसऱ्याच षटकात माघारी पाठवले. अबीद अली ( 60) आणि कर्णधार अझर अली (20) यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण अँडरसननं पुन्हा एक धक्का दिला. त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉड, सॅम कुरन आणि वोक्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेताना पहिल्या दिवशी पाकिस्तानचा निम्मा संघ माघारी पाठवला. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ 45.4 षटकांनंतर थांबवण्यात आला. फवाद चार चेंडू खेळून शून्यावर बाद झाला.

टॅग्स :इंग्लंडपाकिस्तान