लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : गतउपविजेत्या न्यूझीलंड संघाने आज अंतिम फेरीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 1992नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या यजमान इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी करताना किवींच्या धावगतीला लगाम लावला. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्तीलचा अपयशाचा पाढा अंतिम फेरीतही कायम राहिला. सातव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. ख्रिस वोक्सने किवी सलामीवीर मार्टिन गुप्तीलला पायचीत केले. गुप्तील 19 धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेल्या कर्णधार केन विलियम्सनने सलामीवीर हेन्री निकोल्ससह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या सामन्यात विलियन्सनने विक्रमाला गवसणी घातली.
वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम विलियम्सनने स्वतःच्या नावावर केला. त्याने यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत 550+ धावा झाल्या आहेत आणि यंदाच्या स्पर्धेत कर्णधार म्हणून 500 धावांचा पल्ला पार करणारा तो दुसरा कर्णधार आहे. ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचने 507 धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 442 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पण, आज विलियम्सनने दुसरी धाव घेताच एक विक्रम नावावर केला. वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक 548 धावांचा विक्रम श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेच्या ( 2007) नावावर होता. पण, आता हा विक्रम विलियम्सनच्या नावावर झाला आहे.
![]()
अन् इंग्लंडच्या जेसन रॉयनं पंच कुमार धर्मसेनाला मारली मिठी, कारण...
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्यात मैदानावर पंच म्हणून कुमार धर्मसेना आणि मॅरेस इरास्मस ही जबाबदारी पार पाडत आहेत. या सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडचा सलामीवर जेसन रॉय आणि धर्मसेना बराचवेळ एकमेकांशी चर्चा करत होते. रॉयनं तर चक्क धर्मसेनाला घट्ट मिठी मारलेली पाहायला मिळाले. पण, रॉयनं असं का केलं? रॉय आणि धर्मसेना यांच्यातल्या आजच्या दिलजमाईमागे उपांत्य फेरीतील सामन्याचा एक प्रसंग कारणीभूत आहे.
या सामन्यातील 20 व्या षटकात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रॉयला चुकीच्या पद्धतीनं बाद देण्यात आले. चेंडू व्हाईडच्या दिशेनं गेला होता, त्यावर रॉयनं फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, बॅट आणि चेंडू यांच्यात काहीच संपर्क झाला नाही, तरीही ऑसी खेळाडूंनी अपील केलं. बऱ्याच वेळ अपील केल्यानंतर पंच कुमार धर्मसेनानं त्याला बाद ठरवले. त्यानंतर रॉयनं तीव्र शब्दात नाराजी प्रकट केली. या प्रकरणी आयसीसीनं रॉयला मॅच फीमधील 30 टक्के रक्कम दंड म्हणून भरण्याची शिक्षा सुनावली. पण, अंतिम सामन्यापूर्वी रॉयनं पंच धर्मसेना यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची माफी मागितली.