Join us  

इंग्लिश खेळाडूंवर ‘इनहेलर’ वापरण्याची वेळ! रोहित शर्मानेही व्यक्त केली चिंता!

दिल्लीच्या हवेने धोक्याची पातळी ओलांडली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 8:37 AM

Open in App

नवी दिल्ली: आयसीसी वनडे विश्वचषकादरम्यान कमकुवत कामगिरी करीत असलेला गत विजेता इंग्लंडचा संघ भारतातील प्रमुख शहरांमध्ये वास्तव्यादरम्यान इनहेलर वापरण्यास बाध्य होत आहे. याचे कारण हवेतील धोकादायक प्रदूषण. राजधानी दिल्लीतील हवेने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे संघ व्यवस्थापनाला हे पाऊल उचलावे लागले.

ब्रिटिश वेबसाइट ‘आयन्यूज डॉट सीओ डॉट यूके’च्या वृत्तानुसार, इंग्लंडचे अनेक खेळाडू इनहेलर वापरत आहेत. इनहेलरचा वापर खरेतर दम्याचे रुग्ण करतात. कसोटी कर्णधार बेन स्टोक्स याने बंगळुरू येथे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याआधी सरावादरम्यान इनहेलरचा वापर केला होता. गुरुवारी दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेने  ४०० चा आकडा गाठून गंभीर श्रेणी गाठली. प्रदूषणाबाबत मुंबईनेदेखील चिंतेत भर पाडली आहे.

इंग्लंड संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यासाठी सध्या अहमदाबादमध्ये आहे. अहमदाबादमध्ये प्रदूषण पातळी धोक्याबाहेर नसल्याने खेळाडूंना येथे इनहेलरची गरज भासलेली नाही.  मुंबईत द. आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर इंग्लंडचा दिग्गज फलंदाज ज्यो रूट याने प्रदूषणाचा फटका बसल्याचे सांगितले. मात्र, पराभवाचे हे कारण नसल्याचेही स्पष्ट केले. तो म्हणाला, ‘आपण श्वास घेत आहोत, असे जाणवत नव्हते. हा वेगळा अनुभव होता. वातावरणदेखील अंधुक होते. वायू गुणवत्ता किती होती, हे विचारण्यास मी योग्य नसेल. खरे तर असा अनुभव मला याआधी कधीही आलेला नाही.

मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी वाढत्या प्रदूषणावियी चिंता व्यक्त केली होती. दिल्लीत ६ नोव्हेंबर रोजी बांगलादेश-श्रीलंका सामना खेळला जाईल. २०१७ ला अशीच स्थिती उद्भवली होती. तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान लंकेचे खेळाडू मास्क घालून मैदानावर उतरले होते. एका निष्कर्षानुसार, २०१९ ला भारतात प्रदूषणामुळे २३ लाखांहून अधिक मृत्यू झाले होते.

रोहितने व्यक्त केली चिंता!

भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध सामन्याआधी याच मुद्द्यावर मत मांडले. रोहित म्हणाला, ‘माझ्या मते आदर्श स्थितीत प्रदूषणाची समस्या उद्भवू नये. याबाबत आवश्यक पावले उचलली जातील, अशी खात्री वाटते. सध्याची स्थिती आदर्श नाही, हे प्रत्येकाला ठाऊक आहे. माझी मुले, तुमची मुले आणि भविष्यातील पिढ्यांचा विचार करता प्रत्येकाला कुठल्याही भीतीविना जगण्याचा अधिकार मिळायला हवा. क्रिकेटव्यतिरिक्त मला जेव्हा संधी मिळते तेव्हा शुद्ध हवा आणि प्रदूषणमुक्त वातावरणावर भाष्य करतो.’

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपरोहित शर्माइंग्लंडदिल्ली