लंडन : ‘आयपीएलमध्ये केविन पीटरसनचा शानदार करार झाला होता आणि त्यामुळे त्यावेळी संघातील इतर क्रिकेटपटूंचा जळफळाट होत होता,’ असा दावा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने केला आहे. सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या पीटरसनला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने २००९ साली ९.८ कोटी रुपयांमध्ये निवडले होते.
वॉनने म्हटले की, ‘अनेक खेळाडू त्यावेळी पीटरसनवर जळत होते. आता अनेक जण हे वृत्त फेटाळतील, पण त्यावेळी परिस्थिती हीच होती.’ त्यावेळी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने आपल्या खेळाडूंना आयपीएलसाठी परवानगी दिली नव्हती. यामुळे पीटरसन व तत्कालीन कर्णधार अॅन्ड्र्यू स्ट्रॉस यांच्यामध्ये मोठा वादही झाला होता.
वॉनने म्हटले की, ‘वादाची सुरुवात आयपीएलवरूनच झाली होती. पीटरसनच्या मते, आयपीएल खेळून शानदार एकदिवसीय संघ तयार करण्यास मदत होईल. त्यामुळे त्याची आयपीएल खेळण्याची इच्छा होती.’