साउदम्पटन : मधल्या फळीने केलेल्या आश्वासक खेळीच्या जोरावर इंग्लंडने चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताविरोधात २३३ धावांची मजबूत आघाडी घेतली. दिवसअखेर इंग्लंडच्या संघाने ८ बाद २६० धावा केल्या. बटलरने दमदार अर्धशतक झळकावले.
तिसºया दिवसाची सुरुवात इंग्लंडच्या संघासाठी फारशी चांगली नव्हती. अनुभवी अॅलिस्टर कुक, मोईन अली, बेअरस्टो, जेनिंग्ज ही आघाडीची फळी स्वस्तात तंबूत परतल्यावर मधल्या फळीच्या फलंदाजांनी चांगला खेळ केला. कुकला बुमराहने बाद केले. त्यानंतर जेनिंग्ज आणि रुट यांनी डाव सावरला. त्यांनी ५९ धावांची भागीदारी केली. ज्यो रुट याने ४८ धावा केल्या. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना तो बाद झाला. शमीने त्याला धावबाद केले. रुटने आपल्या खेळीत ६ चौकार लगावले. मात्र त्यानंतर बेन स्टोक्स (३० धावा) आणि जोस बटलर (६९ धावा) यांनी ५६ धावांची भागीदारी केली. स्टोक्स बाद झाल्यावर बटलरने सॅम क्युरनला साथीला घेत ५५ धावा केल्या. इशांत शर्माने बटलरला बाद करत ही जोडी फोडली. बटलरने १२२ चेंडूंत ७ चौकार लगावले. तोपर्यंत क्युरन स्थिरावला होता. त्याने आदिल राशिदच्या साथीने धावफलक हलता ठेवला. शमीने आदिल राशिदला बाद केले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा क्युरन ३७ धावा करून नाबाद होता.
शमी हा भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३, इशांत शर्माने २, तर बुमराह आणि आर. आश्विन यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव : सर्व बाद २४६; भारत पहिला डाव : सर्व बाद २७३.
इंग्लंड दुसरा डाव : ९१.५ षटकांत ८ बाद २६० धावा
अॅलिस्टर कुक झे. राहुल गो. बुमराह १२, किटन्स जेनिंग्ज पायचित मोहम्मद शमी ३६, मोईन अली झे. राहुल गो. शर्मा ९, ज्यो रुट धावबाद मोहम्मद शमी ४८, जॉनी बेअरस्टो गो. मोहम्मद शमी ०, बेन स्टोक्स झे. रहाणे गो. आश्विन ३०, जोस बटलर पायचित शर्मा ६९, सॅम क्युरन खेळत आहे. ३७, आदिल राशिद झे. पंत गो. शमी ११, अवांतर ८ धावा; गोलंदाजी - आर. आश्विन ३५-७-७८-१, जसप्रीत बुमराह १९-३-५१-१, इशांत शर्मा १५-४-३६-२, मोहम्मद शमी १३.५-०-५३-३ , हार्दिक पंड्या ९-०-३४-०.