Join us  

दणदणीत विजयासह इंग्लंडची आघाडी, भारताचा आठ गड्यांनी पराभव ; कर्णधार विराट कोहलीचे झुंजार अर्धशतक व्यर्थ 

नियोजनबद्ध खेळ केलेल्या इंग्लंडने भारताला प्रतिकाराची फारशी संधी दिली नाही. कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता भारताकडून फार कोणी झुंज देऊ शकला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 3:01 AM

Open in App

अहमदाबाद : पुन्हा एकदा नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या भारतीयांचा तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडविरुद्ध ८ गड्यांनी पराभव झाला. यासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. भारताला २० षटकांत ६ बाद १५६ धावांवर रोखल्यानंतर इंग्लंडने १८.२ षटकांत २ फलंदाजांच्या मोबदल्यात आवश्यक धावा केल्या.

नियोजनबद्ध खेळ केलेल्या इंग्लंडने भारताला प्रतिकाराची फारशी संधी दिली नाही. कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता भारताकडून फार कोणी झुंज देऊ शकला नाही. दुसरीकडे, इंग्लंडने सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांना मुकल्यानंतर पुनरागमन केलेला वेगवान गोलंदाज मार्क वूड याने इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. त्याने ४ षटकांत ३१ धावा देत रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर असे तीन खंदे फलंदाज बाद केले. ख्रिस जॉर्डनने २ बळी घेत त्याला चांगली साथ दिली.

यानंतर धावांचा पाठलाग करतान जेसन रॉय (९) अपयशी ठरला. मात्र, जोस बटलरने  ५२ चेंडूंत नाबाद ८३ धावा फटकावताना ५ चौकार व ४ षटकार ठोकले. त्याचे तडाखेबंद अर्धशतक निर्णायक ठरले. जॉनी बेयरस्टॉने २८ चेंडूंत नाबाद ४० धावा करत त्याच्यासह इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

त्याआधी, सर्वांचे  लक्ष लागलेल्या रोहित शर्मा चांगल्या सुरुवातीनंतरही अपयशी ठरला. दुसरीकडे, पुन्हा एकदा लोकेश राहुल शून्यावर परतला, तर गेल्या सामन्यातील हिरो ईशान किशनही अपयशी ठरला. कोहलीने ४६ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ७७ धावा चोपल्या. अष्टपैलू हार्दिक पांड्याने २ षटकार ठोकत त्याला चांगली साथ दिली. रोहितसह आघाडीची फळी स्वस्तात बाद झाल्याने भारताची सहाव्या षटकात ३ बाद २४ धावा अशी अवस्था झाली. यानंतर कोहलीने चित्र पालटले. भारताने अखेरच्या ५ षटकांत ६९ धावा कुटल्या. कोहलीने अखेरच्या १७ चेंडूंत ४९ धावांचा चोप दिला. पंतनेही छोटी आक्रमक खेळी केली.

कोहलीचा दणकाकोहलीने १८व्या षटकात तुफानी हल्ला चढवत भारताच्या धावगतीला कमालीचा वेग दिला. त्याने मार्क वूडच्या या षटकात २ षटकार आणि एका चौकारासह १६ धावा कुटल्या. 

पॉवर प्लेमध्ये चौथा नीचांकभारताने संथ सुरुवात करताना पॉवर प्लेमध्ये केवळ २४ धावा फटकावल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात भारताची पॉवर प्लेमधील ही चौथ्या क्रमांकाची निराशाजनक कामगिरी ठरली. 

प्रथम फलंदाजी नकोच ! २०१९ सालापासून आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताला केवळ एकदाच विजय मिळवता आलेला आहे. त्याचवेळी, तब्बल सातवेळा भारताचा पराभव झालेला आहे. म्हणजेच २०१९ सालापासून भारताने ८ वेळा प्रथम फलंदाजी करताना केवळ एकदाच विजय मिळवला आहे.

राहुल पुन्हा फ्लॉपलोकेश राहुल सध्या बॅडपॅचमधून जात आहे. इंग्लंडविरुद्धच्या आतापर्यंतच्या तीन टी-२० सामन्यांतून त्याला केवळ एकच धाव करता आली. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी-२० पदार्पणातही राहुल शून्यावर बाद झाला होता. मात्र यानंतरच्या ३९ डावांमध्ये त्याने दोन शतके आणि १२ अर्धशतके झळकावत आपला दणका दिला होता. परंतु, यानंतर पुन्हा एकदा त्याची कामगिरी खालावली आहे. गेल्या चार टी-२० सामन्यांत तो तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे. 

सामनावीर बटलरसलामीवीर जोस बटलरने सामन्यात तडाखेबंद अर्धशतक झळकावत सामनावीरचा पुरस्कार पटकावला. भारताच्या सर्वच गोलंदाजांविरुद्ध वर्चस्व गाजवताना बटलरने इंग्लंडला विजयी केले. त्याने आधी डेव्हिड मलानसह (१८) दुसऱ्या गड्यासाठी ५८ धावांची भागीदारी केल्यानंतर बेयरस्टॉसह नाबाद ७७ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्का मारला. बटलरने खेळपट्टीचा अंदाज घेतल्यानंतर आक्रमक फटके मारत भारतीयांचे मानसिक खच्चीकरण केले.

धावफलकभारत रोहित शर्मा झे. आर्चर गो. वूड १५, लोकेश राहुल त्रि. गो. वूड ०, ईशान किशन झे. बटलर गो. जॉर्डन ४, विराट कोहली नाबाद ७७, ॠषभ पंत धावबाद (बटलर-कुरेन) २५, श्रेयस अय्यर झे. मलान गो. वूड ९, हार्दिक पांड्या झे. आर्चर गो. जॉर्डन १७. अवांतर : ९ धावा. एकूण२० षटकांत ६ बाद १५६ धावा.बाद क्रम१-७, २-२०, ४-२४, ४-६४, ५-८६, ६-१५६गोलंदाजीराशिद ४-०-२६-०; आर्चर ४-०-३२-०; वूड ४-०-३१-३; जॉर्डन ४-१-३५-२ ; स्टोक्स २-०-१२-० ; कुरेन २-०-१४-०.

इंग्लंडजेसन रॉय झे. रोहित गो. चहल ९, जोस बटलर नाबाद ८३, डेव्हिड मलान यष्टिचीत पंत गो. सुंदर १८, जॉनी बेयरस्टॉ नाबाद ४०, अवांतर - ८ एकूण : १८.२ षटकांत २ बाद १५८ धावा.बाद क्रम : १-२३, २-८१.गोलंदाजी : भुवनेश्वर २-०-२७-० ; शार्दुल ३.२-०-३६-० ; चहल ४-०-४१-१ ; हार्दिक ३-०-२२-० ; सुंदर ४-०-२६-१. 

लक्षवेधी विक्रम- भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक प्रत्येकी ९ टी-२० सामने गमावले. - आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये  कर्णधार म्हणून सर्वाधिक ११ वेळा ५०हून अधिक धावा फटकावण्याच्या न्यूझीलंडच्या केन विलियम्सनच्या विश्वविक्रमाशी कोहलीने केली बरोबरी.- इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने १०० वा टी-२० सामना खेळला.- १०० टी-२० सामने खेळणारा मॉर्गन पहिला इंग्लिश खेळाडू, तर जगातील चौथा क्रिकेटपटू ठरला. - याआधी अशी कामगिरी शोएब मलिक (पाकिस्तान), रोहित शर्मा आणि रॉस टेलर (न्यूझीलंड) यांनी केली आहे. - आंतराष्ट्रीय टी-२० मालिकेत सर्वाधिक २ वेळा शून्यावर बाद होण्याच्या आशिष नेहरा (२०१०, टी-२० विश्वचषक) आणि अंबाती रायुडू (२०१५, द. आफ्रिकेविरुद्ध) यांच्या भारतीय विक्रमाशी लोकेश राहुलने केली बरोबरी. - जोस बटलरने इंग्लंडकडून भारताविरुद्धची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करत इयॉन मॉर्गनला (७१) मागे टाकले. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेट सट्टेबाजीविराट कोहली