Join us  

Corona Virus : इंग्लंड क्रिकेट बोर्डानं उघडला खजिना; केली 570 कोटींची मदत

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे क्लब्ससह खेळाडूंवर आर्थिक संकट ओढावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 11:10 AM

Open in App

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं ( इसीबी) देशातील कौंटी आणि व्यावसायिक क्रिकेटपटूंच्या मदतीसाठी खजिना उघडला आहे. त्यांनी 61 मिलियन पाऊंड म्हणजेच जवळपास 570 कोटींची मदत जाहीर केली. इसीबीनं 28 मे पर्यंत सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय आधीच घेतला होता. क्रिकेट स्पर्धा जून, जुलै किंवा ऑगस्टमध्ये सुरू करण्यावर त्यांचे काम सुरू आहे. 

Corona Virus ने कटुता मिटवली; दिलदार भज्जी अन् युवी धावले आफ्रिदीच्या मदतीला

क्रिकेट स्पर्धा होत नसल्यानं खेळाडू व क्लब्सचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांच्यासाठी इसीबीनं बजेटमध्ये आधीच 40 मिलियन पाऊंडची तरतूद केली होती. ही रक्कम प्रथम श्रेणी कौंटी आणि कौंटी क्रिकेट बोर्डांमध्ये दिली जाणार आहे. ही रक्कम 2020/21 या आर्थिक वर्षासाठी होती, परंतु ती आता त्वरीत दिली जाणार आहे. त्याव्यतिरिक्त 5.5 मिलियन पाऊंड हे कौंटी क्लब्सना त्यांच्या मेंटेनन्ससाठी दिले जातील.  

त्याशिवाय इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करणाऱ्या कौंटी क्लबना त्यांची फी देण्यात येणार आहे. 2020मध्ये जर सामने झाले नाही, तरी ही रक्कम कौंटी क्लबना दिली जाईल. 20 मिलियन हे क्लबना लोन स्वरुपात दिले जातील.

इसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरीसन यांनी सांगितले की,''ही आव्हानात्मक परिस्थिती आहे, याची आम्हाला जाण आहे. त्यामुळे इंग्लंड आणि वेल्समधील सर्व क्रिकेटपटूंना आणि क्लब्सना तातडीची मदत करणं हे आमचं प्राधान्य आहे. कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट सामने रद्द झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्रिकेटपटूवर आर्थिक संकट येणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत.''

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याइंग्लंड