Join us  

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरनला IPL फ्रँचायझींकडून डिमांड

भारताविरुद्धच्या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करणारा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन याला इंडियन प्रीमिअर लीगमधील (IPL) फ्रँचायझींकडून पसंती मिळत आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघ आघाडीवर असल्याचे कळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 1:29 PM

Open in App

मुंबई - भारताविरुद्धच्या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करणारा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन याला इंडियन प्रीमिअर लीगमधील (IPL) फ्रँचायझींकडून पसंती मिळत आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघ आघाडीवर असल्याचे कळत आहे. त्यामुळे 2019च्या आयपीएल लिलाव प्रक्रियेत कुरनला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेण्यासाठी मोठी चढाओढ रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ताफ्यात दाखल घेतल्यानंतरही कुरन संपूर्ण लीगमध्ये खेळणार नसल्याचे माहित असूनही फ्रँचायझींमध्ये त्याच्यासाठी चुरस पाहायला मिळेल. इंग्लंडच्या वन डे संघातील नियमित सदस्य असलेला कुरन पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत राष्ट्रीय संघासोबत अधिक सामने खेळणार आहे. त्यामुळे तो आयपीएलचा पूर्ण हंगाम खेळू शकणार नाही. इंग्लंडने पुढील वर्षांचे वेळापत्रक आधीच जाहीर केले आहे आणि त्यानुसार कुरन महिनाभरही आयपीएलमध्ये खेळणार नाही.

मागील दोन लिलाव प्रक्रियेत इंग्लंडच्या बेन स्टोक्सवर सर्वाधिक बोली लावण्यात आली होती. पण, त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमुळे त्याला आयपीएलचा संपूर्ण हंगामही खेळता आला नव्हता. हीच समस्या कुरनच्या बाबतीत उद्भवू शकते. वन डे विश्वचषक स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता राष्ट्रीय संघ हे कुरनचे पहिले प्राधान्य असेल. 2019ची आयपीएल स्पर्धा 19 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर अवघ्या दहा दिवसांत वन डे विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे.

भरगच्च वेळापत्रक लक्षात घेत इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जो रूट हा आयपीएलसाठी उपलब्ध नसल्याचे आधीच स्पष्ट केले होते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना शुक्रवारपासून सुरू होत आहे. इंग्लंडने या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. या मालिकेत कुरनने 251 धावा आणि 8 विकेट घेतल्या आहेत.  

टॅग्स :इंडियन प्रीमिअर लीगसॅम कुरेनइंग्लंडक्रिकेट