ENG vs PAK Women's World Cup 2025 England And Pakistan Share Points In Rain Affected Clash : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील १६ व्या सामन्यावरही पावसाने पाणी फेरलं. श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने चार वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडपेक्षा सरस खेळ दाखवला. पण शेवटी पावसामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली. परिणामी दोन्हीं संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला. या सामन्यातील एका गुणासह इंग्लंडचा संघाला फायदा झाला असून ते गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाला मागे टाकत अव्वलस्थानी पोहचले आहेत. दुसरीकडे पाकिस्तान संघाचा सेमीचा विषय जवळपास संपल्यात जमा आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाक संघाने आधी गोलंदाजीत अन् मग फलंदाजीतही दाखवली ताकद, पण...
पावसाच्या व्यत्ययामुळे पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामना प्रत्येकी ३१-३१ षटकांचा करण्यात आला होता. यात इंग्लंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ९ विकेट्सच्या मोबदल्यात १३३ धावा केल्या. यात अखेरच्या ६ षटकात इंग्लंडच्या संघाने ५४ धावा केल्याचे पाहायला मिळाले. पावसाचा खेळ सुरुच राहिल्यामुळे पुन्हा टार्गेट बदलले. डकवर्थ लुईसनुसार, पाकिस्तानच्या संघाला या सामन्यात ११३ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुनीबा अली आणि ओमाइमा सोहेल या दोघींनी पाकिस्तानला दमदार सुरुवात करुन दिली. पहिल्या ६.४ षटकात पाक संघाने एकही विकेट न गमावता ३४ धावा केल्या होत्या. गोलंदाजीनंतर फलंदाजीतही पाकिस्तानच्या संघाने चमक दाखवली. पण पाऊस आला अन् खेळ बिघडला. सामना पाकिस्तानच्या आवाक्यात आहे असे वाटत असताना पाकिस्तानच्या संघाला एका गुणावरच समाधान मानावे लागले.
WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पाकिस्तानी संघानं टीम इंडियालाही दिला दणका, ते कसं?
गोलंदाजी वेळी पाकची कर्णधार फातिमा सनाचा 'चौकार', पण सगळं निर्थकच ठरलं
फातिमा सनाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या संघाने यंदाच्या हंगामातील स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यात पराभवाचा सामना केला होता. दुसरीकडे त्यांच्यासमोर चार वेळचा चॅम्पियन आणि यंदाच्या हंगामात विजयाची हॅटट्रिक साधणाऱ्या इंग्लंडच्या संघाचे आव्हान होते. दमदार गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाने इंग्लंडला अडचणीत आणत स्पर्धेतील पहिल्या विजयाची आस निर्माण केली होती. इंग्लंडच्या संघाकडून चार्ली डीनच्या ३३ धावा वगळता कुणालाही फलंदाजीत धमक दाखवता आली नाही. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने ६ षटकात ४ विकेट्स घेत गोलंदाजीत कमाल दाखवली. तिच्याशिवाय सादिका इक्बाल हिने २ तर डायना बेग आणि रमीन शमीन हिने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. पण शेवटी सगळं निर्थकच ठरलं. आता उर्वरित तिन्ही सामने जिंकले तरी पाकिस्तानच्या संघाच्या खात्यात ७ गुण जमा होतील. हे गुण सेमीसाठी उपयुक्त ठरणार नाहीत.