Join us  

NZ vs BAN, Ross Taylor Guard of Honour: बांगलादेशी खेळाडूंनी जिंकली मनं, न्यूझीलंडच्या रॉस टेलरला दिलं 'गार्ड ऑफ ऑनर', प्रेक्षकांनीही उभं राहून वाजवल्या टाळ्या (Video)

बांगलादेशी खेळाडूंची ती कृती पाहताच सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांनी स्टेडियम दणाणून सोडलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 10:21 AM

Open in App

NZ vs BAN, Ross Taylor: पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाने न्यूझीलंडवर थरारक विजय मिळवत कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसापासूनच न्यूझीलंडने पकड मिळवली. पहिल्या दिवशी टॉम लॅथमचं दीडशतक आणि डेवॉन कॉनवेची दमदार खेळी याच्या जोरावर न्यूझीलंडने साडेतीनशेनजीक मजल मारली होती. तोच डाव दुसऱ्या दिवशी पुढे सुरू करताना टॉम लॅथमने अडीचशतकी खेळी केली, तर कॉनवेने नववर्षातील दुसरं शतक झळकावलं. पण या साऱ्यापेक्षाही चर्चा रंगली ती रॉस टेलरच्या मैदानातील प्रवेशाची.

रॉस टेलर हा न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू. त्याने ही मालिका सुरू होण्याआधीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. बांगलादेशविरूद्धची कसोटी मालिका ही त्याची शेवटची कसोटी मालिका असेल असंही त्याने सांगितलं होतं. त्यामुळे आज रॉस टेलर आपल्या शेवटच्या कसोटी फलंदाजीसाठी मैदानावर उतरला त्यावेळी बांगलादेशी खेळाडूंनी स्पर्धा बाजूला ठेवून थेट त्याला गार्ड ऑफ ऑनर दिलं आणि उपस्थितांची मनं जिंकली. रॉस टेलर मैदानात येताच स्टेडियममध्ये असलेले सर्व प्रेक्षकही उठून उभे राहिले आणि त्यांनीही उभं राहून रॉस टेलरचं स्वागत केलं. तो क्षण साऱ्यांनाच भावनिक करणारा होता.

पाहा व्हिडीओ-

रॉस टेलर फलंदाजी करताना २८ धावांवर बाद झाला. त्यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या ४११ होती. एवढी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर न्यूझीलंडला पुन्हा दुसरा डाव खेळण्याची वेळ येणार नाही असा साधारण अंदाज साऱ्यांनीच बांधला. त्यामुळेच टेलर बाद झाल्यानंतरही बांगलादेशी खेळाडूंनी धावत जाऊन त्याच्याशी हस्तांदोलन केलं आणि त्याच्या समृद्ध कारकिर्दीला मान दिला.

पाहा व्हिडीओ-

रॉस टेलर स्वस्तात बाद झाला असला तरी सलामीवीर टॉम लॅथमने धडाकेबाज खेळी केली. त्याने ३४ चौकार आणि २ षटकार खेचत २५२ धावांची आतषबाजी केली. डेवॉन कॉनवेनेही १०९ धावांची खेळी केली. तर टॉम ब्लंडेलने नाबाद अर्धशतक (५७) झळकावलं. या दमदार फलंदाजीच्या जोरावरच न्यूझीलंडने पहिला डाव ६ बाद ५२१ धावांवर घोषित केला.

टॅग्स :रॉस टेलरन्यूझीलंडबांगलादेश
Open in App