Join us  

Eliminator, SRH vs RCB : विराट कोहलीच्या संघाचे पॅकअप; सनरायझर्स हैदराबाद Qualifier 2साठी पात्र

SRHनं ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि क्वालिफायर २ मध्ये प्रवेश पक्का केला. रविवारी त्यांच्यासमोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असणार आहे. 

By स्वदेश घाणेकर | Published: November 06, 2020 11:08 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात आज एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) असा सामना एकतर्फी झाला. एबी डिव्हिलियर्सच्या अर्धशतकाच्या जोरावर RCBनं समाधानकारक पल्ला गाठला. पण, केन विलियम्सन व जेसन होल्डर यांनी RCBला पराभूत केले. SRHनं ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि क्वालिफायर २ मध्ये प्रवेश पक्का केला. रविवारी त्यांच्यासमोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असणार आहे. 

आरोन फिंच संघात असतानाही विराट कोहलीनं RCBसाठी देवदत्त पडीक्कलसह सलामीला येण्याचा निर्णय घेतला. त्याला बाद करण्यासाठी डेव्हिड वॉर्नरनं पहिले षटक संदीप शर्माच्या हाती सोपवलं. जेसन होल्डरनं दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराटला ( ६) बाद केले. त्यानं पडीक्कलला ( १) प्रियान गर्गकरवी झेलबाद केलं. १५ धावांत दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर एबी डिव्हिलियर्स आणि फिंच यांनी सावध पवित्राच घेतला. शाहबाद नदीमनं फिंचला ११व्या षटकात ३२ धावांवर झेलबाद केले. मोईन अलीच्या वाट्याला फ्री हिटचा चेंडू आला अन् त्याच चेंडूवर तो बाद झाला.  

एबी  डिव्हिलियर्सला दुसऱ्या बाजूनं योग्य साथ न मिळाल्यानं RCBला २० षटकांत ७ बाद १३१ धावाच करता आल्या. एबीनं ४३ चेंडूंत ५६ धावा केल्या. टी नटराजननं टाकलेल्या १८व्या षटकात उत्कृष्ट यॉर्कर टाकून एबी डिव्हिलियर्सचा त्रिफळा उडवला. होल्डरनं २५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. टी नटराजननं दोन विकेट्स घेतल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक ६५ यॉर्कर त्यानं फेकले. 

लक्ष्याचा पाठलाग करताना SRHची सुरुवात फार चांगली झाली नाही. श्रीवत्स गोस्वामी (०) बाद झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर व मनीष पांडे यांनी डाव सावरला, परंतु मोहम्मद सिराजनं RCBला मोठं यश मिळवून दिलं. वॉर्नरची विकेट त्यानं घेतली खरी, परंतु त्यावरून मतमतांतर आहेत. वॉर्नर १७ धावांवर बाद झाला. त्यानंतर मनीष पांडे ( २४) व प्रियाम गर्ग ( ७) झटपट माघारी परतल्यानं SRH अडचणीत सापडताना दिसले.

केन विलियम्सन आणि जेसन होल्डर यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना SRHच्या विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या. अखेरच्या ६ चेंडूंवर SRHला विजयासाठी ९ धावांची गरज होती. केननं पहिल्या चेंडूवर एक धाव घेताना ४४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. ४ चेंडूंत ८ धावा हव्या असताना होल्डरनं चौकार खेचला. परत चौकार मारून होल्डरनं SRHचा विजय पक्का केला. केननं ४४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह नाबाद ५०, तर होल्डरनं ३ चौकारांच्या मदतीनं नाबाद २४ धावा केल्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. 

टॅग्स :IPL 2020सनरायझर्स हैदराबादरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर