IPL 2024 Updates : आयपीएलचा सतरावा हंगाम आता अंतिप टप्प्यात येऊन पोहोचला आहे. साखळी फेरीतील ७० सामन्यांपैकी ६५ सामने झाले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांनी प्ले ऑफचे तिकीट मिळवले आहे. साखळी फेरीतील सर्व सामने संपताच प्ले ऑफच्या लढती खेळवल्या जातील. मात्र, करा किंवा मराचे सामने सुरू होण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडूंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण चांगलाच संतापला आहे. राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर आणि पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम करन आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी इंग्लंडला परतणार आहेत.
खरे तर इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. यासाठी सर्व खेळाडू मायदेशी परतले आहेत. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात २२ तारखेपासून चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. ही मालिका म्हणजे जूनमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषकाची तयारी असेल.
इरफान पठाणने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिले की, संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध राहत जावा... अथवा येतच जाऊ नका. एकूणच इरफानने इंग्लंडच्या खेळाडूंना लक्ष्य केले. आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळू न शकल्याने इरफान संतापल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, २ जूनपासून ट्वेंटी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ही स्पर्धा पार पडेल. सलामीचा सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. इंग्लिश संघ ब गटात असून ते आपल्या अभियानाची सुरुवात स्कॉटलंडविरूद्धच्या सामन्याने करतील. हा सामना ४ जून रोजी खेळवला जाईल. यानंतर इंग्लिश संघाचा दुसरा सामना शनिवारी ८ जून रोजी ऑस्ट्रेलियाशी, तिसरा सामना ओमानविरुद्ध गुरुवारी, १३ जूनला आणि चौथा सामना शनिवारी १५ जून रोजी नामिबियाविरुद्ध होणार आहे. ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ -जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल राशिद, फिल सॉल्ट, रीस टोपले, मार्क वुड.