- सौरव गांगुली
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध अपयशी ठरल्यानंतरही घरच्या मैदानावर द. आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिकेत चांगली कामगिरी करू शकला नाही. जय- पराजय खेळाचा भाग आहे. खरे सांगायचे तर तिसऱ्या सामन्यात शानदार विजयासाठी द. आफ्रिका संघाची पाठ थोपटायलाच हवी. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषकाचे आयोजन होईल. यादरम्यान अनेक सल्ले कानावर येतील. अशावेळी कर्णधार विराट कोहलीने शांतपणे आणि एकाग्रता भंग न होऊ देता सर्वकाही ध्यानात घ्यायला हवे.
विश्वचषक संपताच थांबलेली मधल्या फळीची चर्चा पुन्हा सुरू झाली. विराटने ही बाब फार गंभीरतेने घेण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. विराटच्या नेतृत्वात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळत आहे. अशावेळी या युवा खेळाडूंचाही कर्णधाराला शंभर टक्के पाठिंबा मिळण्याची गरज राहील. रिषभ पंत यात पहिल्या स्थानावर आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये रिषभची एन्ट्री शानदार होती. माझ्यामते तो सर्व प्रकारच्या क्रिकेटसाठी योग्य खेळाडू आहे, पंतच्या फटक्यांच्या निवडीबद्दल फार ऐकायला मिळत आहे. तथापि टीकाकारांनी हे ध्यानात घ्यावे की पंत शिकण्याच्या स्थितीत आहे. परिपक्व होईल, तसा तो कामगिरीत चमकदार ठरेल. तो मॅचविनरही सिद्ध होऊ शकेल.
कितीही टीका झाली तरी विराटचे मार्गदर्शन पंतसाठी निर्णायक सिद्ध होऊ शकेल. टी२० क्रिकेटला शॉट सिलेक्शनचे व्यासपीठ बनू देऊ नये. मधल्या फळीचे अपयश वगळता हा संघ तगडाच आहे. तरीही विराटने टी२० त शैलीदार फिरकी गोलंदाजांना संधी द्यायला हवी. अन्य खेळाडूंना संधी देण्यासाठी युझवेंद्र चहल याला विश्रांती दिली असावी, असा माझा अंदाज आहे. टी२० प्रकारात चहलची उपस्थिती अनिवार्य ठरते. भारताला दोन डावखुºया फिरकीपटूंची गरज नाही. लवकरच कसोटी मालिकेला सुरुवात होणार असून भारतीय संघ चांगल्या खेळपट्ट्यांवर खेळेल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. (गेमप्लान)