Join us

आयपीएलच्या कामगिरीवर विश्वचषक खेळण्याचे स्वप्न पाहू नका - विराट कोहली

हैदराबाद : ‘आयपीएलमधील कामगिरी विश्वचषक संघाच्या निवडीसाठी उपयुक्त ठरेल, असा कुणी समज करून घेऊ नये. असे कुणाला वाटत असेल ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 06:10 IST

Open in App

हैदराबाद : ‘आयपीएलमधील कामगिरी विश्वचषक संघाच्या निवडीसाठी उपयुक्त ठरेल, असा कुणी समज करून घेऊ नये. असे कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज असेल,’ असे कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट कोहली म्हणाला, ‘आयपीएलच्या कामगिरीचा विश्वचषकावर काही प्रभाव पडेल, असे वाटत नाही. विश्वचषकासाठी निवड करताना आयपीएलची कामगिरी विचारात घेतली जाणार नाही, असे माझे मत आहे. आम्हाला तगडा संघ हवा आहे. विश्वचषकाला सामोरे जाण्याआधी अखेरच्या दोन स्थानासाठी खेळाडूंचा शोध घेऊ. ऋषभ पंतला काही सामने खेळण्याची संधी दिली जाईल, पण एक गोलंदाज कमी खेळविण्याच्या अटीवर असे करणार नाही. संघ नियोजनाचा देखील विचार केला जाईल. संघाचा ताळमेळ कायम राखून ज्यांना संधी द्यायची आहे, त्यांना खेळविता येईल.’

त्याचप्रमाणे, ‘आयपीएलपूर्वीच आम्हाला संघ निश्चित करायचा आहे. त्यामुळे आयपीएलनंतर संघात बदल होण्याची शक्यता नाही. काही खेळाडू आयपीएलमध्ये अपयशी ठरल्यास त्यांना वगळणार नाही,’ असेही कोहलीने यावेळी म्हटले.विश्वचषक स्पर्धेमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळण्याबाबत कोहली म्हणाला, ‘एखाद्या सामन्यात संघाला गरज असल्यास मी चौथ्या स्थानावर खेळण्यास तयार आहे. तसे करताना मला आनंदच होईल. मी यापूवीर्ही अनेकदा चौथ्या क्रमांकावर खेळलो आहे. त्यामुळे त्यासाठी काही सामन्यांत प्रयोग करण्याची आवश्यकता नाही. तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आल्यानंतरही माझा खेळ आहे तसाच राहणार आहे.’

लोकेश राहुल याने टी२० त धावा काढून विश्वचषकाच्या संघासाठी दावेदारी सादर केल्याकडे विराटने लक्ष वेधले. ‘ लोकेश राहुलचं कमबॅक ही संघासाठी सकारात्मक बाब आहे. त्याला सातत्य राखण्याची आवश्यकता आहे. विश्वचषक संघासाठी तो चांगला पर्याय ठरू शकतो, परंतु त्याला कामगिरी उंचवावी लागेल,’ असे कोहलीनं स्पष्ट केलं.