Join us  

IND vs AUS : दिनेश कार्तिकची भविष्यवाणी खरी ठरली; जडेजानं कमाल केली, कांगारूंना जाळ्यात फसवलं

वन डे विश्वचषक २०२३ मधील आपल्या पहिल्याच सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी कमाल केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 4:47 PM

Open in App

चेन्नई : वन डे विश्वचषक २०२३ मधील आपल्या पहिल्याच सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी कमाल केली. आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात साखळी फेरीतील सामना खेळवला जात आहे. चेन्नईमध्ये होत असलेल्या सामन्यात फिरकीपटूंनी रंगत आणली. रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या तालावर नाचवताना मोठे धक्के दिले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना यजमान भारतीय संघाने सामन्यात पकड मजबूत केली. ३२ षटकांपर्यंत ५ बाद १३० धावा करण्यात ऑस्ट्रेलियन संघाला यश आले आहे. 

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याला सुरूवात होण्यापूर्वी स्टार फलंदाज दिनेश कार्तिकने एक भविष्यवाणी केली होती, ती आता खरी होत असल्याचे दिसते. कारण खेळपट्टीवर रवींद्र जडेजाचा बोलबाला राहील असा अंदाज कार्तिकने वर्तवला होता. त्यामुळे जडेजाने तीन बळी घेऊन कार्तिकची भविष्यवाणी खरी करून दाखवली. 

जडेजानं कमाल केलीरवींद्र जडेजाने स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन आणि अलेक्स कॅरी या त्रिकुटाला बाहेरचा रस्ता दाखवला. दरम्यान, आजच्या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजून गेला. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून यजमान भारतीय संघाला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. लक्षणीय बाब म्हणजे शुबमन गिल आज अनुपस्थित असून इशान किशन सलामीवीर म्हणून खेळत आहे. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, कॅमेरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, ॲलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादिनेश कार्तिकरवींद्र जडेजा