बंगळुरू : जगातील सर्वोत्तम खेळाडू आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जाता यावे यासाठी एकांतात सराव करणे पसंत करतात आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीदेखील त्याला अपवाद नाही. धोनी इंग्लंड दौऱ्याआधी सर्वांपासून दूर राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीच्या नेटवर घाम गाळताना दिसत आहे.
सचिन तेंडुलकरही त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या अखेरच्या काही वर्षांत मुंबईच्या बांद्रा परिसरात स्वत: असाच सराव करायचा आणि एनसीएत धोनीचे सराव सत्रही असेच काहीसे आहे. धोनीने शंभर चेंडूंचा सामना केला आणि त्यात जवळपास ७० टक्के थ्रो डाऊनने करण्यात आली होती. धोनीने १५ जूनला एकदिवसीय संघांच्या खेळाडूंसोबत यो यो टेस्ट दिली होती आणि दुसरे खेळाडू गेल्यानंतरही तो तेथे थांबला होता. धोनी आज राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत थ्रो डाऊन तज्ज्ञ रघू आणि वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरसह येथे पोहोचला आणि जवळपास अडीच तासांपर्यंत त्याने १८ यार्ड अंतरावरून थ्रो डाऊनचा सराव केला. (वृत्तसंस्था)