- व्हीव्हीएस लक्ष्मण लिहितात...
आयपीएलच्या १० पर्वांपैकी आठमध्ये अंतिम फेरी गाठणे सोपी बाब नाही. नक्कीच चेन्नई सुपरकिंग्स अभिनंदनास पात्र आहे. पण, संघाच्या यशात कुठलेच गुपित दडलेले नाही. सुरुवातीपासून संघाचा ताळमेळ साधण्याच्या प्रक्रियेवर लक्ष देता येईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संघाने संस्कृतीनुसार खेळाडूंची निवड केली आहे आणि त्यांना प्रत्येक पातळीवर स्वातंत्र्य दिलेले आहे. अशा पद्धतीचे पूर्ण स्वातंत्र्य असेल तर खेळाडूंचे मनोधैर्यही उंचावलेले असते. शेन वॉटसनचा विचार करता यंदाच्या मोसमात या अष्टपैलू खेळाडूला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, पण दिल्लीविरुद्धच्या महत्त्वाच्या क्लालिफायर -२ मध्ये त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली. सीएसकेची दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन. सुरुवातीपासून महेंद्रसिंग धोनी संघाचा कर्णधार आहे आणि ९ सत्रांपासून स्टीफन फ्लेमिंग संघाचे प्रशिक्षक आहेत. फ्रॅ न्चायर्झी मालकांचा क्रिकेटच्या घडामोडींमध्ये कुठला हस्तक्षेप नाही. दरम्यान, हीच बाब आता अन्य फ्रॅन्चायझी संघांवर प्रभाव टाकत असल्याचे दिसत आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या यशामध्ये ‘सीएसके पॅटर्न’ उपयुक्त ठरला आहे. संघ व्यवस्थापनाने संघासोबत कुठली छेडछाड केलेली नाही. त्यात युवा खेळाडूंनी आपल्यातर्फे शंभरटक्के योगदान दिले. शुक्रवारी रात्री क्वालिफायर-२ मध्ये अनुभवी व युवा खेळाडूंदरम्यान शानदार लढत अनुभवाला मिळाली. शेवटी एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखालील अनुभवी चेन्नईने चमकदार कामगिरी करीत अंतिम फेरीत स्थान मिळवले.
रविवारी हैदराबादमध्ये अंतिम लढत रंगतदार व्हायला हवी. धोनी कर्णधार, यष्टिरक्षक व फलंदाज म्हणून ‘एक्स फॅक्टर’ सिद्ध होईल, हे तेवढेच खरे आहे. फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर मुंबईचे पारडे वरचढ भासत आहे. त्याचसोबत त्यांनी यंदाच्या मोसमात चेन्नईचा तीनवेळा पराभव केलेला आहे. चार दिवसांच्या विश्रांतीनंतर हा संघ अंतिम फेरीत खेळत आहे. या उलट धोनीला मोठे अंतर गाठत अंतिम फेरी खेळावी लागत आहे. मुंबईने गेल्या दोन अंतिम सामन्यात चेन्नईचा पराभव केला आहे. त्यामुळे जेतेपदाचा दावेदार म्हणून मुंबईच आहे, पण आयपीएलच्या अंतिम फेरीत ‘एमएसडी’ला कमी लेखणे धोकादायक ठरू शकते.