चेन्नईच्या‘फ्लॉप शो’मध्ये धोनी चमकला, यादवने ओढली चेन्नई एक्सप्रेसची ‘चेन’

वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक जिंकून कोलकाता कर्णधार श्रेयस अय्यरने दवाचा होणारा परिणाम ओळखून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 05:16 AM2022-03-27T05:16:03+5:302022-03-27T05:16:54+5:30

whatsapp join usJoin us
Dhoni shines in Chennai's 'flop show', Yadav pulls Chennai Express's 'chain' | चेन्नईच्या‘फ्लॉप शो’मध्ये धोनी चमकला, यादवने ओढली चेन्नई एक्सप्रेसची ‘चेन’

चेन्नईच्या‘फ्लॉप शो’मध्ये धोनी चमकला, यादवने ओढली चेन्नई एक्सप्रेसची ‘चेन’

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रोहित नाईक

मुंबई : आयपीएलच्या १५व्या सत्राची दमदार सुरुवात केली ती कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) वेगवान गोलंदाज उमेश यादव याने. त्याने ऋतुराज गायकवाड आणि डीवोन कॉन्वे या सलामीवीरांना स्वस्तात बाद करत गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जच्या (सीएसके) फलंदाजीला सुरुंग लावला. यामुळे अडखळत सुरुवात झालेल्या सीएसकेने २० षटकात ५ बाद १३१ धावांची मजल मारली. महेंद्रसिंग धोनीने प्रतिकूल परिस्थितीत नाबाद ५० धावांची मोलाची खेळी करत चेन्नईला समाधानकारक मजल मारुन दिली.

वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक जिंकून कोलकाता कर्णधार श्रेयस अय्यरने दवाचा होणारा परिणाम ओळखून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय सार्थ ठरविताना उमेशने कोलकाताला जबरदस्त सुरुवात करुन दिली. गेल्या सत्रातील ऑरेंज कॅप विजेता ऋतुराज गायकवाड पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. विशेष म्हणजे यंदाच्या सत्राची सुरुवात नो बॉलने झाली. मात्र, यानंतर उमेशने भेदक मारा करताना चेन्नईला जबर हादरे दिले. अडखळत्या सुरुवातीमुळे चेन्नईला फलकावर १०० धावा उभारण्यासाठी १८.३ षटकांची प्रतीक्षा करावी लागली.
रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायुडू यांनी डाव सावरण्याचा चांगला प्रयत्न केला. फिरकीपटू वरुण उथप्पाला बाद करुन ही जोडी फोडली आणि नंतर लगेच रायुडूही धावबाद झाला. दोन प्रमुख फलंदाज पाठोपाठ बाद झाल्याने चेन्नईवर प्रचंड दडपण आले. यामुळे नवा कर्णधार रवींद्र जडेजा आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनाही सावध पवित्रा घ्यावा लागला. अष्टपैलू शिवम दुबेही सपशेल अपयशी ठरला. जडेजा-धोनी यांनी सहाव्या गड्यासाठी नाबाद ७० धावांची बहुमूल्य भागीदारी केली.

चेन्नईने अकराव्या षटकात केवळ ६१ धावांत अर्धा संघ गमावल्यानंतर जडेजा-धोनी यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढील २९ चेंडूंत त्यांना केवळ १२ धावांचीच भर टाकता आली. त्यामुळे चेन्नईची धावगती कमालीची खालावली. परंतु, यानंतर दोघांनी हळूहळू चेन्नईच्या डावाला आकार दिला. विशेषत: धोनीने ७ चौकार आणि एका षटकारासह मोलाची खेळी केली. जडेजाला फटकेबाजी करण्यात अडचणी आल्याने चेन्नईच्या धावगतीवर परिणाम झाला. पण, धोनीन एकाकी किल्ला लढवताना संघाला शंभरपलीकडे मजल मारुन दिली.

प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आयपीएल सामन्यांसाठी प्रत्येक स्टेडियमच्या एकूण प्रेक्षक क्षमतेनुसार २५ टक्के प्रेक्षकांना प्रवेशाची परवानगी दिली आहे. यंदाच्या सत्रातील सलामीचा सामना रंगलेल्या वानखेडे स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ३३ हजार १०८ इतकी आहे. यानुसार ८,२७७ प्रेक्षकांची उपस्थिती वानखेडे स्टेडियमवर होती, अशी माहिती मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) सूत्रांकडून मिळाली.

कमतरता चीअर लीडर्सची
n तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा भारतामध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीत आयपीएलला सुरुवात झाली. यंदाच्या सत्रात 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी मिळाली. आयपीएलमध्ये प्रत्येक चौकार-षटकारानंतर तसेच बळी गेल्यानंतर चीअर लीडर्स आपल्या अदाकारीने खेळाडूंचा उत्साह उंचावत असत. या लीडर्ससोबत प्रेक्षकांचाही जबरदस्त जल्लोष होत असे. मात्र, यंदा चीअर लीडर्स नसल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूरही उमटला.

रैनाच्या नव्या इनिंगला सुरुवात
n सुरेश रैनासाठी लिलावामध्ये कोणत्याही संघाने उत्सुकता दाखवली नाही. त्यामुळे यंदाच्या मोसमात तो समालोचन करताना दिसणार आहे. सीएसके-केकेआर या पहिल्या सामन्यापासून रैनाने आपल्या नव्या इनिंगला सुरुवात केली. समालोचनाची सुरुवात त्याने महेंद्रसिंग धोनीच्या उल्लेखानेच केली. रैना म्हणाला, 'धोनीभाई संघात आहे; पण तो कर्णधार नाही. धोनीभाई संघात असूनही नाणेफेकीसाठी तो न दिसणे चाहत्यांसाठी निराशाजनक ठरले. या गोष्टीची सवय होण्यास वेळ लागेल. जेव्हा मी समालोचन क्षेत्राकडे जाण्यास निघालो, तेव्हा एक क्षण गपचूपपणे पिवळी जर्सी परिधान करावी आणि स्टेडियममध्ये जाण्याचं मन झालं होतं.'
 

Web Title: Dhoni shines in Chennai's 'flop show', Yadav pulls Chennai Express's 'chain'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.