Join us  

'धोनीमुळे माझी कुप्रसिद्ध फलंदाजी आठवली'

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केलेल्या संथ फलंदाजीमुळे महेंद्रसंग धोनीवर टीकेची झोड उठली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 4:54 AM

Open in App

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केलेल्या संथ फलंदाजीमुळे महेंद्रसंग धोनीवर टीकेची झोड उठली होती. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना संघ अडचणीत आल्यावर धोनीने केलेल्या बचावात्मक खेळाची क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावरून खिल्ली उडवली. आता विक्रमादित्य सुनील गावसकर यांनीही धोनीच्या या खेळीवर कटाक्ष टाकला असून, ‘लॉडर््सवरील धोनीच्या अतिसंथ फलंदाजीमुळे आपल्याला १९७५ च्या विश्वचषकातील आपली नाबाद ३६ धावांची खेळी आठवली, गावसकर यांनी म्हटले.गावसकर यांनी टीका केली असली तरी त्यांनी धोनीच्या खेळीचा बचावही केला. त्यांनी म्हटले, ‘जेव्हा तुम्ही अत्यंत कठीण स्थितीत फसता, तेव्हा तुमच्याकडे मर्यादित पर्याय असतात. अशावेळी डोक्यात नकारात्मकता वाढते. चांगला फटकासुद्धा क्षेत्ररक्षकाकडे जातो. त्यामुळे दबाव अधिकच वाढतो. धोनीच्या लॉर्ड्सवरच्या खेळीने मला माझ्या कुप्रसिद्ध खेळीची आठवण झाली. ती खेळी मी याच मैदानावर खेळली होती.’तंत्रशुद्ध आणि संयमी फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या सुनील गावसकर यांना सुरुवातीच्या काळामध्ये एकदिवसीय क्रिकेटशी जुळवून घेणे फारसे जमले नव्हते. त्यातच १९७५ च्या विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध इंग्लंड लढतीत सुनील गावसकर यांनी सलामीला येत १७४ चेंडूत नाबाद ३६ धावांची खेळी केली होती. गावसकर यांच्या या खेळीवर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात टुकार खेळी म्हणून ओळखली जाते. या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून २०२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर झालेल्या दुसºया एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ३२२ धावा कुटल्या होत्या. त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या इतर फलंदाजांप्रमाणेच महेंद्रसिंग धोनीलाही अपेक्षित फलंदाजी करता आली नाही. गरज असतानाही त्याला मोठे फटके खेळता येत नव्हते. त्यामुळे त्याने बचावात्मक खेळ करण्यावर भर दिला. अखेर ५९ चेंडूत ३७ धावा करून तो बाद झाला. तसेच या लढतीत भारतीय संघाला ८६ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

टॅग्स :सुनील गावसकर